Home टॉप स्टोरी पंतप्रधान मोदी देणार चार वर्षाचा हिशेब

पंतप्रधान मोदी देणार चार वर्षाचा हिशेब

0

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास आठ महिने उरले आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्याआधी केंद्र सरकार नवीन प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावणार आहे. ज्या प्रकल्पांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे किंवा येत्या तीन महिन्यात हे प्रकल्प पूर्ण होतील अशा २५ प्रकल्पांची निवड पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: करणार असून केंद्र सरकारचे चार वर्षातील विकास कामे म्हणून याचा प्रचार करण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक महिन्यापूर्वी सर्व खात्यांकडे राज्यनिहाय सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती मागितली होती. यामध्ये २०१४ मध्ये भाजप नेतृत्वातील केंद्र सरकार आल्यानंतर सुरू झालेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. जेणेकरून हे प्रकल्प चार वर्षात केंद्र सरकारने पूर्ण केले असल्याचा दावा करण्यात येणार आहे. सूत्रांनी, दिलेल्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकांआधी याची यादी जाहीर करण्यात येणार असून सरकार आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये या कामांचा उल्लेख करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान १० लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात पंतप्रधान मोदी एका प्रकल्पाचे उद्घाटन करतील. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असणा-या रस्ते आणि परिवहन विभागाने सर्वाधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुढील तीन महिन्यात देशातील विविध भागात रस्ते प्रकल्पांचे उद्धाटन करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना केंद्राने प्राधान्य दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण देशात ५० सभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प उद्धाटनदेखील त्याचाच एक भाग असणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर केंद्र सरकारला कोणत्याही प्रकल्प कार्यक्रमाचे उद्घाटन करता येणार नाही.

दरम्यान, केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणा-या ‘आयुष्यमान’ योजनेचे २५ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. तीन राज्यांमध्ये वर्षाखेरपर्यंत विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या तीन राज्यांपैकी एका राज्यात ‘आयुष्यमान’चे लोकार्पण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version