Home ताज्या घडामोडी नोटाबंदी, जीएसटीमुळेच जमावाकडून मारहाणीच्या घटना

नोटाबंदी, जीएसटीमुळेच जमावाकडून मारहाणीच्या घटना

0

नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीएसटीमुळे भारतात जमावाकडून करण्यात येत असलेल्या हत्यांमध्ये (लिंचींग) वाढ झाल्याची जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

हॅम्बर्ग- नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीएसटीमुळे भारतात जमावाकडून करण्यात येत असलेल्या हत्यांमध्ये (लिंचींग) वाढ झाल्याची जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. द्वेषाला प्रेमानेच जिंकता येऊ शकते, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले. जर्मनीमधील हॅम्बर्ग येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

बेरोजगारीचे वाढते प्रमाण, नोटाबंदीमुळे लहान व्यवसाय भरकटणे तसेच जीएसटीची अयोग्य प्रकारे अंमलबजावणी या प्रकारांमुळे मारहाणीचे व हत्यांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप राहुल यांनी सरकारवर केला. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट करत छोट्या आणि मध्यम उद्योगांना उद्ध्वस्त केल्याने अनेकजण बेरोजगार झाल्याचे म्हटले. त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केली, ज्यामुळे गुंतागुंत झाले असल्याचेही ते म्हणाले.

छोटय़ा उद्योगांवर अवलंबून असणा-या अनेकांना पुन्हा आपल्या गावी जावे लागले. सरकारने केलेल्या या तीन गोष्टींमुळे देश संतापला आहे आणि याच गोष्टी वृत्तपत्रात वाचायला मिळतात. जेव्हा तुम्ही जमावाकडून मारहाण झाल्याचे ऐकता, भारतात दलितांवर हल्ला झाल्याचे ऐकता, अल्पसंख्यांकावर हल्ला झाल्याचे ऐकता तेव्हा यामागे हेच कारण असते, असे राहुल गांधींनी सांगितले.

यावेळी राहुल गांधींनी भाजपा सरकारवर दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा आरोप केला. २१ व्या शतकात लोकांना सहभागी करुन न घेणे धोक्याचे आहे. जर तुम्ही लोकांना योग्य दृष्टीकोन दिला नाही तर इतर कोणीतरी देईल. त्यामुळे इतक्या मोठय़ा वर्गाला विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवणे जोखमीचे आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधींनी यावेळी राजीव गांधींच्या मारेक-यांवरही भाष्य केले. जेव्हा मी माझ्या वडिलांच्या मारेक-याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला ते आवडले नाही. मला त्याच्यात त्याची रडणारी मुले दिसत होती, असे ते म्हणाले. राजीव गांधींच्या हत्येमागे एलटीटीईच्या प्रभारकरनचा हात होता. श्रीलंकेत २००९ साली त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

..म्हणून मी मोदींची गळाभेट घेतली

तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणे म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमाने उत्तर दिले, असे स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला. नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला नसल्याचे राहुल यांनी सांगितले. परंतु, मी त्यांच्याशी सहमत नाही. कारण अहिंसा हे भारताचे प्रतीक आहे आणि भारतीयत्वाचे सार आहे. पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल द्वेष पसरवणारी टीका करत आहेत. मी त्यांच्याबद्दल स्नेह दाखवला. हे जग द्वेषाने नाही, तर प्रेमाने चालते, हे सांगण्याचा प्रयत्न केला, असा टोला त्यांनी लगावला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version