Home महामुंबई ठाणे नेरळ सरकारी दवाखान्याची रुग्णवाहिका बंद

नेरळ सरकारी दवाखान्याची रुग्णवाहिका बंद

0

कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी ज्या सरकारी दवाखान्यात जातात, त्या नेरळमधील प्राथमिक दवाखान्याची रुग्णवाहिका मागील दोन महिन्यांपासून बंद आहे.

नेरळ- कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी ज्या सरकारी दवाखान्यात जातात, त्या नेरळमधील प्राथमिक दवाखान्याची रुग्णवाहिका मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. ही रुग्णवाहिका बंद असल्याने ग्रामीण भागातून प्रसुतीसाठी येणा-या महिला रुग्णांचे प्रामुख्याने हाल होत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ रुग्णवाहिका देऊन रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना पारधी व नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे यांनी केली आहे.

नेरळ रेल्वे स्थानक आणि एस टी स्थानकाला लागूनच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची लया सध्या हरवली असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे व एस टी स्थानक जवळ असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी नेरळमध्ये बदली घेण्यास पसंती देतात. कारण या ठिकाणी बारुग्ण विभाग आणि प्रसुतीसाठी कायम रुग्णांची वर्दळ असते. परंतु आता या ठिकाणी रुग्णांची सोय होण्याऐवजी सध्या गरसोयच अधिक होताना दिसत आहे.

सिझरियनविना प्रसूति करण्याची चांगली कला अवगत असलेल्या येथील महिला कर्मचा-यांमुळे ग्रामीण भागातील महिला नेरळ या दवाखान्याला प्राधान्य देतात. मात्र तेथील सरकारी रुग्णवाहिका कायम नादुरुस्त असल्याने त्याचा फटका सर्व रुग्णांना आर्थिक झळ पोहचवण्यास कारणीभूत ठरत आहे. प्रसूतिसाठी येणा-या महिलांना नेहमी खासगी वाहनातून किंवा कडाव, कळंब आणि कर्जत येथून रुग्णवाहिका मागवावी लागते. प्रसूति झालेल्या महिलेला रुग्ण तीन दिवसानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिका-यांची असते. मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता भांबेरे यांना नाही.

नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची हेळसांड करण्यापेक्षा, ती दुरुस्त करण्याची कार्यवाहीदेखील नेरळ दवाखान्याचे प्रशासन करत नाही. त्यामुळे रुग्णवाहिका बंद ठेवून आपली जबाबदारी झटकणा-या या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकारी संघटनेचे खजिनदार जैतू पारधी यांनी केली आहे. त्यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे संबंधित डॉक्टरांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, असे पत्र दिले आहे. तर या दवाखान्यासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी सरपंच कोकाटे यांनी केली आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नवीन रुग्णवाहिकेबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version