Home महामुंबई नेरळ शांतता कमिटीच्या सभेत चर्चेचे फक्त गु-हाळ

नेरळ शांतता कमिटीच्या सभेत चर्चेचे फक्त गु-हाळ

0

गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नये यासाठी  नेरळ शांतता कमिटीच्या सभा घेण्यात आली. पण त्यात वाहतूक समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही.

नेरळ –  गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या सभेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत विविध पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेली काही दशके वाहतुकीची समस्या सोडवण्यात सातत्याने अपयश येत असल्याने पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. मात्र ती सूचना अपु-या कर्मचा-यांमुळे मान्य न झाल्याने वाहतूक समस्येवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

नेरळ पोलिस ठाण्याची शांतता कमिटीची सभा पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. गणेशोत्सव आणि इतर कालावधीत नेहमी अडथळा ठरत असलेली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी जिल्हा परिषद विश्रामगृहात वाहने लावण्यास सुरुवात करावी, असे जिल्हा परिषद सदस्य सुरेश टोकरे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी ग्रामपंचायतीने तेथे पार्किंग सुरू करावी, अशी सूचना केली. परंतु रेल्वे स्टेशनसमोरील रिक्षा आधी हटवा, लोकांना लोकल गाडी पकडण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे रिक्षा संघटनांना विश्वासात घेण्याची सूचना अंकुश शेळके, जयेद नजे, राजेश गायकवाड, अंकुश दामणे, नितीन कांदळगावकर यांनी केली. त्याच वेळी टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र वाघेश्वर आणि महेश मिरकुटे यांनी गणेशोत्सव काळात आमची वाहने बाहेरून प्रवास करतील, असे जाहीर केले.

गेली 25-30 वर्षे अशीच चर्चा शांतता कमिटीत वाहतुकीच्या बाबतीत झाली, मात्र त्याची फलश्रृती पोलिसांनी दाखवून द्यावी, असे गजेंद्र वाघेश्वर यांनी सांगतानाच पोलिसांनाच संपूर्ण कारवाई करण्याचे अधिकार देण्याची सूचना ग्रामस्थांना केली. मात्र पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी दिवसभर कारवाई करण्यासाठी पुरेसे पोलिस कर्मचारी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस कारवाई करायला का घाबरतात, असे प्रश्न अनेकांनी विचारले. इतक्या चर्चेनंतरही वाहतूक समस्येवर तोडगा न निघाल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात नेरळची वाहतूक समस्या रामभरोसे राहण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे आवाहन

चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असून पोलिसांकडून अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र गणेशोत्सव काळात सर्वानी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version