Home महामुंबई नेरळ रेल्वेस्थानकात सोयीसुविधांचा अभाव

नेरळ रेल्वेस्थानकात सोयीसुविधांचा अभाव

0

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील सोयीसुविधांबाबत रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन फक्त आश्वासन देण्यात धन्यता मानत आहेत.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील सोयीसुविधांबाबत रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन फक्त आश्वासन देण्यात धन्यता मानत आहेत. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवळी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेनमुळे महत्त्व प्राप्त झालेल्या नेरळ रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाबाबत रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रिटिश काळापासून असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकात पूर्वी गाडय़ा येथील जुन्या मालधक्क्यावर थांबायच्या. सध्या गाडया नेरळ रेल्वेस्थानकात थांबत असल्या तरी जुन्या मालधक्क्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. ५ वर्षापूर्वी मध्य रेल्वेने कर्जतकडील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती केली. त्या वेळी मालधक्का आणि अन्य स्थानकांची दुरुस्ती कामे मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.

मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवत मध्य रेल्वेने दुरुस्ती कामाकडे पाठ फिरवली. दुरुस्तीअभावी नेरळ स्थानकातील ५० वर्षापूर्वी बांधलेला निवारा शेड मोडकळीस आला आहे. या लाकडी निवारा शेडला सध्या बांबूचे टेकू लावण्यात आले आहेत. पण शेड कधीही कोसळण्याची भीती आहे. रेल्वेस्थानकात गाडी आल्यास फलाटावर मोठी गर्दी होते. प्रवाशांच्या गर्दीत टेकूला धक्का लागल्यास निवारा शेड कोसळून मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे निवारा शेड काढून टाकण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या निमित्ताने जगभरातील पर्यटक माथेरानला जाण्यासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर नेरळ रेल्वेस्थानकाची प्रतिमा उजळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक सुशोभीकरणाचे नियोजन करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हस्कर सातत्याने करत आहेत. त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीने महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन सोयीसुविधांच्या कामांचे निवेदन दिले आहे.

या निवेदनात प्रामुख्याने मुंबईच्या दिशेने बांधण्यात येणा-या आणि गेले १० वर्षापासून रखडलेल्या पादचारी पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पादचारी पुलासाठी दोन्ही फलाटांवर खांब उभे करण्यात आले आहेत. पादचारी पुलाचे लोखंडी भाग आणण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या रात्री मेगाब्लॉक करून गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे, तर नेरळच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे माथेरान मिनीट्रेनसाठी असलेल्या शेडसमोर पादचारी पूल उभारण्याची मागणीही काही महिन्यांपासून जोर धरत आहे.

नेरळ रेल्वेस्थानकातील दोन्ही फलाटांवर अर्ध्याहून अधिक भागात प्रवाशांसाठी निवारा शेड नाही. त्यामुळे कर्जतकडे जाणारे ९० टक्के प्रवासी उन्हात उभे राहतात. फलाट क्रमांक १ वर मुंबईवरून आलेले पर्यटक उतरत असतात. त्या सर्व प्रवाशांसाठी फलाटावर स्वच्छतागृह नाही. मध्य रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांच्या दुचाकी किंवा अन्य वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था नाही.

नेरळ रेल्वेस्थानकात दोन्ही बाजूला मुबलक जागा असल्याने येथे वाहनतळाची व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच स्थानकात कुठेही सार्वजनिक टेलिफोनची व्यवस्थाही नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने त्वरित या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी येथील प्रवासी व कर्मचारी संघटनांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version