Home महामुंबई ठाणे नेरळ-माथेरान मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद!

नेरळ-माथेरान मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद!

0

शतक महोत्सव साजरा केलेली आणि ‘जागतिक हेरिटेज वारसा’ म्हणून समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

माथेरान- शतक महोत्सव साजरा केलेली आणि ‘जागतिक हेरिटेज वारसा’ म्हणून समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे रुळावरून घसरण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी मिनीट्रेनने प्रवास करण्यासाठी नेरळ स्थानकात आलेल्या प्रवाशांचा मोठा हिरमोड झाला. परिणामी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून पर्यटनाच्या हंगामाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या मिनीट्रेनचे डबे १ मे आणि ८ मे २०१६ रोजी रुळावरुन घसरले होते. १ मेच्या अपघातात ३० पर्यटक किरकोळ जखमी झाले होते. अमन लॉज स्थानकाजवळ झालेला हा अपघात जर थोडासा पुढे झाला असता, तर मिनीट्रेन खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ झाला असता. मात्र मिनीट्रेनच्या दोन डब्यांमध्ये असलेल्या ब्रेक पोर्टर कामगारांनी ब्रेक यंत्रणा सक्षमपणे हाताळल्याने हा अनर्थ टळला.

हा अपघात ताजा असतानाच पुन्हा ८ मे रोजी नेरळहून माथेरानला जाणा-या मिनीट्रेनचा एक डबा पुन्हा त्याच जागी घसरला. त्यावेळी संतप्त प्रवाशांनी मिनीट्रेनच्या मोटरमनला मारहाण केली होती. यानंतर मोटरमन संघटनेने बंद पुकारला, मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी धाव घेत त्यांची समजूत काढली.

मात्र या दोन अपघातांची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेत मिनीट्रेन सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे रेल्वे बोर्डाने या मिनीट्रेनला ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज’० दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यातच या अपघातांमुळे रेल्वेची नाचक्की होण्याची शक्यता आहे.

या सगळय़ाच्या पार्श्वभूमीवर २ मे रोजी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी या रेल्वेमार्गाची पाहणी केली होती. यानंतर २२ ठिकाणे धोकादायक आढळल्याने मिनीट्रेनची गती कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र तरीही ८ मे रोजी पुन्हा अपघात झाल्याने भविष्यात एखादा मोठा अपघात होऊ नये, त्यात प्रवाशांच्या जीवावर बेतू नये, आणि रेल्वेचीही बदनामी होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या काळात रेल्वे मार्गाची दुरुस्ती होणार असल्याचे समजते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version