Home महामुंबई नेरळ एसटी स्थानक खड्डयात!

नेरळ एसटी स्थानक खड्डयात!

0

नेरळ एसटी स्थानकात चिखल व पाणी साचले आहे. स्थानकाकडे जाणारा रस्ताही जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वर्षे दुरुस्त न केल्याने खड्डय़ात हरवला आहे.

नेरळ – नेरळ एसटी स्थानकात चिखल व पाणी साचले आहे. स्थानकाकडे जाणारा रस्ताही जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वर्षे दुरुस्त न केल्याने खड्डय़ात हरवला आहे. दरम्यान, एसटी महामंडळ आणि अन्य सरकारी यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

रायगड एसटी आगार विभागातील महत्त्वाचे एसटी स्थानक म्हणून नेरळ एसटी स्थानक ओळखले जाते. मात्र, गेली अनेक वष्रे नेरळ स्थानक खासगी जागेत उभे आहे. २५ वर्षे जागेचा ताबा असलेल्या एसटी महामंडळानेदेखील आजपर्यंत जागा ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.

तालुका समन्वय समितीने भू-संपादन करण्याचे अधिकार महामंडळाला देऊनही ही जागा ताब्यात घेण्यात आली नाही. त्यामुळे एसटी स्थानकात दोन दशकात प्रवासी शेडदेखील बांधण्यात आली नाही. तसेच पावसामुळे एसटी स्थानक व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास कोणतीही यंत्रणा पुढे येत नाही. त्यामुळे स्थानकातून प्रवास करणा-या शेकडो प्रवाशांना एसटीतून उतरताना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागतो.

दरम्यान, एसटी स्थानकाकडे जाणारा रस्तादेखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून तब्बल १० वर्षे डांबरीकरणाविना आहे. या रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या वर्षी येथील रिक्षा संघटनेने ४०० मीटरच्या या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते. मात्र खासगी वाहनांची वाढती संख्या पाहता यंदा खड्डे भराव मोहीम राबवण्यासाठी कोणतही संघटना पुढकार घेत नसल्याचे दिसून येते.


कर्जत-नेरळ-शेलू रस्त्याची चाळण

मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील अनेक जुन्या-नव्या रस्त्यांची चाळण झाली आहे. एमएमआरडीएकडून बांधण्यात आलेल्या कर्जत-नेरळ-शेलू रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डय़ा-खड्डय़ांतून मार्ग काढताना वाहनचालकांची चांगलीच दमछाक होत आहे. दरम्यान, पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यांची ही परिस्थिती झाल्याने संपूर्ण पावसाळा या रस्त्यांवरून कसा प्रवास करायचा, असा प्रश्न येथील प्रवासी आणि वाहनचालक करत आहेत.

गेल्या वर्षी कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. त्यात कर्जत-मुरबाड रस्ता, कोठिंबे रस्ता, खांडस रस्ता, कळंब-पाषणे रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. तर कर्जत-खोपोली आणि कर्जत-डोणे या प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. त्या रस्त्यावरून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहेत. दरम्यान, एमएमआरडीएने बांधलेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. तर वाहनचालकांचा प्रवास अपघात मुक्त आणि सुखकर व्हावा, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्याचे प्राधिकारणाचे उपअभियंता सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version