Home महामुंबई ठाणे नेरळमध्ये बेकायदा सिलिंडरची विक्री

नेरळमध्ये बेकायदा सिलिंडरची विक्री

0

रायगड जिल्ह्यात परवाना नसतानाही कर्जत आणि माथेरानमधील हॉटेल व्यावसायिकांना करण्यात येणा-या बेकायदा सिलिंडरची विक्री शुक्रवारी जागरूक नागरिकांनी उधळून लावली.

नेरळ – रायगड जिल्ह्यात परवाना नसतानाही कर्जत आणि माथेरानमधील हॉटेल व्यावसायिकांना करण्यात येणा-या बेकायदा सिलिंडरची विक्री शुक्रवारी जागरूक नागरिकांनी उधळून लावली. बदलापूरहून ३७ सिलिंडर घेऊन आलेला हा टेम्पो तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असला तरी सणासुदीच्या काळात बेकायदा सिलिंडर विक्री होत असतानाही नेरळ पोलिसांनी कारवाई न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हैदराबाद येथे नोंदणी कार्यालय असलेल्या एका कंपनीचे सिलिंडर घेऊन एक टेम्पो नेरळमध्ये फिरत असल्याचे येथील नागरिकांनी पहिले होते. मात्र शंका आल्याने येथील सुमित क्षीरसागर या तरुणाने याबाबत नेरळ एजन्सीत जाऊन सिलिंडर भरलेला टेम्पो आपण पाठवला आहे का, अशी विचारणा केली. मात्र हा टेम्पो आपला नसल्याचे उत्तर कंपनीने दिले. हा प्रकार क्षीरसागर याने नेरळचे सरपंच भगवान चंचे यांच्या कानावर घातला. त्यांनी या बाबत अधिक माहिती घेण्यास सांगितले.

शोधाअंती हा टेम्पो सायंकाळी सहा वाजता सापडला. सिलिंडरवर लिहिलेल्या कंपनीविषयी शंका आल्याने भगवान चंचे, आशिष गोरडे, नंदू कोळंबे, रोशन शिंगे यांनी टेम्पो नेरळ पोलिस ठाण्यात आणला. मात्र पोलिसांनी हात वर करत हा गुन्हा आमच्याकडे नाही असे सांगितले. त्यामुळे भगवान चंचे यांनी कर्जत तहसीलदार युवराज बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी केलेल्या चौकशीत रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि कर्जत पुरवठा कार्यालयाकडे या टेम्पोविषयी काहीच माहिती सापडलेली नाही. त्यामुळे हा टेम्पो तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

अधिकृत बाजारात व्यावसायिकांना १३०० रुपयांना सिलिंडर घ्यावे लागत असताना, अवघ्या हजार रुपयांना हे सिलिंडर मिळत असल्याने व्यापा-यांचा बेकायदा विक्री होत असलेले सिलिंडर घेण्याकडे कल असल्याचे सांगितले जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version