Home महामुंबई नेरळमध्ये पाण्यासाठी वणवण

नेरळमध्ये पाण्यासाठी वणवण

0

नेरळमध्ये वाढत्या लोकसंख्येचा ताण पाणीपुरवठा योजनेवर पडत असल्याने ऐन उन्हाळयात शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

नेरळ-  झपाटयाने नागरिकीकरण होत असलेल्या नेरळ गावाचे रूपांतर शहरात होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत येथील पायाभूत सोयी-सुविधा कमी पडत आहे. नेरळची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊन १३ वर्षे झाली, त्यानंतर कोणतीही नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण पाणीपुरवठा योजनेवर पडत असल्याने ऐन उन्हाळयात शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. दरम्यान, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी रहिवाशांना धावपळ करावी लागत आहे.

राज्यात युतीची सत्ता असताना १९९५ मध्ये नेरळ वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. २००० मध्ये ही योजना जीवन प्राधिकरणाने नेरळ हस्तांतरित केली. २०३१ची लोकसंख्या गृहीत धरून नेरळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र, मुंबईचे उपनगर म्हणून झपाटयाने विकसित होत असलेल्या नेरळचे गावपण कधीच हरवून गेले आहे. नेरळ शहर वाढू लागले असताना, दीड-दीड तासाने असलेल्या उपनगरीय लोकलमुळे   मुंबईमधून नेरळमध्ये स्थानिक होणा-या लोकांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम नेरळ ग्रामपंचायतीच्या पायाभूत सोयी-सुविधांवर पडत आहे.

नेरळचे रस्ते वाहतुकीला अपुरे पडत आहेत. तर दुसरीकडे या नागरिकीकरणाचा सर्वाधिक फटका नेरळच्या पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. नेरळमधील आजचे पाणी वाटप आणि काही वर्षापूर्वीचे पाणी वितरण यांचा विचार केला असता, आता गावाच्या अनेक भागात तासभरदेखील पाणीपुरवठा होत नाही. सखल भागात आणि सत्ताधारी मंडळी राहत असलेल्या भागात अधिक वेळ पाणी आणि इतर भागाला कमी वेळ पाणी, असा काहीसा दुजाभाव पाणी वितरणात होताना दिसतो.

नेरळची नळ पाणी योजना तयार करताना वर्ष २०३० ला शहराची जी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती, लोकसंख्येला तो आकडा आताच नेरळ गावाच्या जवळ आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेता, मोठे उपनगर म्हणून नेरळची पाणी योजना प्रस्तावित करण्याची गरज आहे. त्यासाठी आताच नियोजन केल्यास भविष्यात येणा-या अडचणी उद्भवणार नाहीत. तसेच नेरळ हे पूर्वी जसे पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण होते तसे भविष्यात राहू शकते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version