Home महाराष्ट्र कोकण नेरळमधील १०० वर्षाच्या शाळेची पालक करणार दुरुस्ती

नेरळमधील १०० वर्षाच्या शाळेची पालक करणार दुरुस्ती

0

नेरळ येथील १०० वर्ष जुन्या कन्याशाळेची इमारत धोकादायक बनली असून त्यामुळे याठिकाणी वर्ग भरवले जात नाहीत.

नेरळ – नेरळ येथील १०० वर्ष जुन्या कन्याशाळेची इमारत धोकादायक बनली असून त्यामुळे याठिकाणी वर्ग भरवले जात नाहीत. या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सातत्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र त्यांच्यापैकी कुणालाही याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अखेर पालकांनीच वर्गणी काढून या इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कर्जत पंचायत समितीलाही कळवण्यात आले आहे.

यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून सदर इमारतीच्या वर्गात कोणताही विद्यार्थी बसविला जात नाही. तसा निर्णय कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतला असून परिणामी पहिली ते सातवीचे वर्ग दोन शिफ्टमध्ये भरविले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार असून याबाबत त्यांनी कर्जत पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेकडेही पाठपुरावा केला होता. शाळा व्यवस्थापन समितीने मागील २ वर्षात पंचायत समितीला अनेक ठराव व निवेदने दिली आहेत. मात्र तरीही या शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत मंजूर करण्याचे काम प्रशासनाकडून होत नाही. मागील चार महिने सातत्याने कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर तर व्यवस्थापन समिती जास्तच आक्रमक झाली आहे.

दोन शिफ्टमध्ये शाळा भरवल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरुन न निघण्यासारखे असून प्रशासन दुर्लक्ष करणार असेल, तर पालकच वर्गणी काढून इमारतीची दुरुस्ती करतील, असा निर्णय पालकसभेत घेण्यात आला आहे.

या सभेवेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता अशोक शिंदे, उपाध्यक्ष सुभाष नाईक, सविता भाटकर, आरती राणे, नथूराम घाडगे, मारुती चव्हाण, भारती डांगरे, जोत्स्ना बोराडे, सविता तुंगे, विमल देठे, ज्योती सावंत, सुमन चव्हाण, राधिका गुप्ता, नम्रता भागवत यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version