Home महामुंबई नेरळमधील विहिरींवर खडा पहारा

नेरळमधील विहिरींवर खडा पहारा

0

‘तळे राखी तो पाणी चाखी’ ही म्हण ख-या अर्थाने सध्या नेरळजवळील अडवळ-धनगरवाड्यातील रहिवासी सार्थ ठरवत आहेत. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाच, येथील काही विहिरींवर रात्रीच्या वेळेत पाणीचोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना पाठवठ्याच्या जागांवर रात्रीच्या वेळेस खडा पहारा द्यावा लागत आहे.

नेरळ – उन्हाची काहिली वाढत आहे, तशी पाण्याची टंचाई अधिकच जाणवत आहे. नेरळजवळील काही भागांत तर विहिरींनी आताच तळ गाठला आहे. आजूबाजूच्या परिसरातील ही तीव्र पाणीटंचाई पाहता येथील अडवळ-धनगरवाड्यातील रहिवाशांना धास्ती लागली आहे, ती असलेल्या पाण्याची चोरी न होण्याची. अडवळपलीकडील भागांत पाणीटंचाई असल्याने येथील रहिवासी रात्रीच्या वेळेत विहिरींतील पाणी नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

अडवळ-धनगरवाडी पूर्वी डोंगराच्या कुशीत वसली होती. मात्र तेथे पिण्याचे पाणी नसल्याने येथील रहिवाशांनी तेथून स्थलांतर केले. आज येथे केवळ २५ घरे आहेत. तर बाजूला असलेल्या कातकरवाडीत १५ घरे आहेत. या ४० कुटुंबांसाठी तेथूनच ५०० मीटर अंतरावर सरकारतर्फे विहीर खोदून देण्यात आली आहे. माथेरानच्या डोंगर रांगातून येणा-या एका ओहोळावर ही विहीर बांधण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही वस्त्यांपासून ही विहीर लांब आणि खोलगट भागात असल्याने तेथे कोणी आलेले दिसत नाही. हे पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने आणि पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, हे पाणी अन्य कोणी नेणार तर नाही ना, अशी भीती येथील रहिवाशांत आहे. तर ओहोळात खड्डे खोदून साठवण्यात आलेल्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जातो. मात्र हे पाणी रात्रीच्या वेळेस चोरून नेले जात असल्याने येथील तरुण रात्रीच्या वेळी येथे पहारा देत आहेत. असे करूनही काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने येथील रहिवाशांची पाण्यासाठीची पायपीट वाढणार आहे.

पाणी योजना रखडल्या

पुढील काळात कातकरवाडी आणि धनगरवाडीतील महिलांना पिण्याचे पाण्यासाठी भडवळ गाठावे लागणार आहे. भडवळ गावात प्रत्येक घरात नळ असल्याने इथे पाण्यासाठी महिलांची गर्दी वाढत असते. दरम्यान, दामत-भडवळ नळपाणी योजनेचे काम लवकर पूर्ण झाल्यास आदिवासी-धनगर समाजापर्यंत पाणी पोहोचू शकणार आहे. मात्र रखडलेली पाणी योजना पूर्ण होण्याचे नाव घेत नसल्याने धनगरवाडा आणि कातकरवाडीतील रहिवाशांना तूर्तास तरी रात्र जागावी लागणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version