Home महामुंबई ठाणे नेरळच्या जिजामाता तलावाचे सुशोभिकरण लवकरच

नेरळच्या जिजामाता तलावाचे सुशोभिकरण लवकरच

0

नेरळमधील नागरिकांचे मनोरंजन आणि करमणुकीचे ठिकाण असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसराला अवकळा आली आहे.
नेरळ- नेरळमधील नागरिकांचे मनोरंजन आणि करमणुकीचे ठिकाण असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसराला अवकळा आली आहे. १५ वर्षापूर्वी लावलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर मुलांची खेळणीही मोडकळीस आली आहेत. त्यामुळे जिजामाता तलाव परिसराचे रूप बदलण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली होती. दरम्यान, जिजामाता तलाव परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. नगरपालिका हद्दीत नसेल असा कायापालट करण्यात येईल ,अशी माहिती नेरळचे सरपंच भगवान चंचे यांनी दिली.

नेरळमध्ये राजमाता जिजामाता तलाव हा सावळाराम जाधव हे सरपंच असताना करमणुकीसाठी तयार करण्यात आला. त्यावेळी कारंजे आणि बैठक व्यवस्था अशी मुबलक सोय होती. पण नेरळकरांसाठी तेवढीच जागा होती. नंतर या तलावात बोटिंग सुरू झाले त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न सुरू झाले. आताचे सरपंच भगवान चंचे यांनी पेव्हर ब्लॉकचे रस्ते संपूर्ण तलाव परिसरात करून घेतले. या तलावाच्या माध्यमातून मासेमारीचे उत्पन्नदेखील मिळत होते, मात्र गेल्या वर्षभरापासून मासेमारीचे कंत्राट रद्द झाले आणि जिजामाता तलावाकडे दुर्लक्ष झाले. आता तेथील पंधरा वर्ष पूर्वीची जुनी झाडे उन्मळून पडली आहेत. लहान मुलांची खेळणी मोडकळीस आली आहेत, झोपाळेही तुटले आहेत. ग्रामपंचायतीच्या बोटी धूळखात पडल्या आहेत. त्याच वेळी येथील सुरक्षारक्षकांसाठी असलेली खोलीही अनेक दिवस बंद आहे .

राजमाता जिजामाता तलावाकडे ग्रामपंचायतीचे लक्ष कमी झाले, असे येथील ग्रामस्थाचे म्हणणे असेल, पण आम्ही तलाव परिसर देखणा दिसावा, म्हणून एक आराखडा तयार करत आहोत. त्याचे कामदेखील सुरू आहे. हा आराखडा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेपुढे आम्ही मांडणार आहोत. तेथे मंजुरी घेऊन तलाव परिसर तयार करण्याचा आमचा मानस आहे. तसेच ज्या ठिकाणची झाडे पडली आहेत तेथे नवीन झाडे लावण्याचाही आमचा विचार आहे, अशी माहिती सरपंच भगवान चंचे यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version