Home महाराष्ट्र कोकण निवडणूक काळात हॉटेलवर पोलिसांची करडी नजर

निवडणूक काळात हॉटेलवर पोलिसांची करडी नजर

0

निवडणुकीच्या काळातील राजकीय राडेबाजी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे. 
मालवण– निवडणुकीच्या काळातील राजकीय राडेबाजी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात हॉटेलमध्ये येणा-या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांनी या कालावधीत येणा-या पर्यटकांची सविस्तर माहिती रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनी दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अशा नोंदी ठेवणे बंधनकारक असून व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे अशा पर्यटकांची माहिती लपवली गेल्यास व त्यातून राजकीय राडेबाजीला प्रोत्साहन मिळाल्यास संबंधित हॉटेल व्यावसायिकांचा परवाना जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांचे बाहेरील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने येथे दाखल होतात. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पर्यटक बनून येणा-या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. हे तथाकथित पर्यटक बहुतांश वेळा हॉटेलवर उतरत असल्याने हॉटेल व्यावसायिकांना निवडणुकीच्या काळात येणा-या सर्व पर्यटकांच्या सविस्तर नोंदी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुले, मुली काही हॉटेलमध्ये ठरावीक कालावधीसाठी खोली घेऊन अनैतिक प्रकार करतात. ही बाब सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय घातक असून असे प्रकार होत असल्यास त्याचीही माहिती तत्काळ पोलिसांना देण्याची सूचना बुलबुले यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलिस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, उपनिरीक्षक अमोल चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाची आहे. हॉटेल व्यावसायिकाचाही यात सहभाग आहे. निवडणुकीच्या काळात येथे येणा-या प्रत्येक पर्यटकाचे ओळखपत्र, त्याच्या वाहनाचे नाव, क्रमांक, रंग याची माहिती हॉटेल व्यावसायिकाने ठेवावी. पोलिसांकडून रोज रात्री हॉटेलची तपासणी होणार आहे. या वेळी अधिका-यांना नोंदवलेल्या माहितीचे रजिस्टर दाखवावे. पर्यटकांचा येथे येण्याचा मूळ उद्देश काय, याची माहिती घेत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पर्यटक आलेले असल्यास त्यांची तत्काळ पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. मतदानाच्या आठवडयाभरापूर्वी असे पर्यटक येथे दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय राडेबाजी घडल्यास मालवणचे नाव खराब होऊन त्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी. – विश्वजीत बुलबुले, पोलिस निरीक्षक, मालवण

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version