Home टॉप स्टोरी नासाची ‘हनुमान उडी’ २४ तासांनी लांबणीवर

नासाची ‘हनुमान उडी’ २४ तासांनी लांबणीवर

0

तांत्रिक बिघाडामुळे तळपत्या सूर्याला गवसणी घालणा-या ‘सोलर पार्क प्रोब’ यानाची पाठवणी रविवारी दुपारी करण्यात येणार आहे.

वॉशिंग्टन- चंद्र आणि मंगळावरील स्वा-यांनंतर अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था शनिवारी दुपारी १ वाजता तळपत्या सूर्याला गवसणी घालण्यासाठी, त्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी सूर्याच्या दिशेने अंतराळ यान पाठविणार होती. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या क्षणी या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता या यानाची पाठवणी रविवारी दुपारी करण्यात येणार आहे. दरम्यान, नासाने हे उड्डाण २४ तासांनी लांबणीवर टाकले आहे.

रामायण काळामध्ये हुनमंताने लहान असताना फळासारख्या भासणा-या लालबुंद सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे. सूर्याला गवसणी घालणा-या या यानाचे नाव सोलर पार्क प्रोब असे असून ते सूर्यामध्ये होणा-या गूढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे. हे यान सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का, यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार असून सौरवादळाची उत्पत्ती सूर्याच्या करोनामधून होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानले जात आहे. हे यान दुस-या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे.

सौरवादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज इजीन पार्कर या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला ‘पार्कर सोलर प्रोब’ असे नाव देण्यात आले आहे.

नासा आणि जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तरीत्या १९७६ साली हेलिअस-२ नावाचे यान पाठवले होते.

दरम्यान, नासाचे हे यान एका कारच्या आकाराएवढे असून ते सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल दूरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत सूर्याची उष्णता आणि प्रखर प्रकाशाचा आजपर्यंत कोणत्याही यानाने सामना केलेला नाही.

फ्लोरिडाच्या केप केनवेरल येथून शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ३ मिनिटांनी हे यान सूर्याकडे झेपावणार होते. परंतु, वेळ मोजणा-या घडय़ाळामध्ये समस्या निर्माण झाल्याने नासाने यानाचे उड्डाण २४ तासांनी लांबणीवर टाकले. नासाच्या तंत्रज्ञांकडे ६५ मिनिटांचा कालावधी होता.

मात्र, बिघाड दुरुस्त न झाल्याने उड्डाण लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. हे यान युनायटेड लाँच अलायन्सच्या डेल्टा ४ या रॉकेटद्वारे सोडण्यात येणार आहे. यानंतर पुढील काही महिन्यांत हे यान सूर्याजवळ पोहोचेल. हे यान आतापर्यंतच्या मानवनिर्मित कोणत्याही यंत्रांपेक्षा सर्वात जवळ जाऊन सूर्याचे निरीक्षण करणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कक्षेचे तापमान ३०० पटींनी जास्त असते. हे यान २०२४ पर्यंत सात वेळा सूर्यप्रदक्षिणा करणार आहे. प्रोब आपल्यासोबत अन्य उपकरणेही घेऊन जात आहे. याद्वारे सूर्याच्या बाहेरील वातावरणासोबत आतील स्फोटक वातावरणाचेही निरीक्षण करण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version