Home टॉप स्टोरी नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली

नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली

0

नालासोपारा घातपात कटप्रकरणी एटीएसने राज्यभरातून एकूण १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुंबई/पुणे- नालासोपा-यात वैभव राऊतकडून जप्त केलेल्या बॉम्ब आणि स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून शुक्रवारी संध्याकाळी हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती शनिवारी आणखी वाढली असून एटीएसने केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली, राज्यभरातून एकूण १२ जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई करत, राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला. एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली होती. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे. वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या तिघांविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील १६, १८, २०, भारतीय दंड संहितेतील कलम १२०ब, भारतीय स्फोटके कायदा आणि स्फोटजन्य पदार्थ कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अटक झालेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे, असे एटीएसने सांगितले आहे. आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला.

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार खब-याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघांवर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली.

नालासोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. हे बॉम्ब कमी तीव्रतेचे असून त्यामुळे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण हे तरुण घेत होते का, या दृष्टीनेही तपास होत आहे. हे बॉम्ब, स्फोटके आणि अन्य वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे एटीएसचे म्हणणे आहे.

कसा आला संशय?

सनातनच्या पनवेलजवळच्या आश्रमावर गुप्तचरांची पाळत होती. तेथे कोण येते, किती वेळ थांबते, सोबत येताना कोण येते, जाताना कोणासोबत जाते, कोण थांबते, किती वेळ थांबते याची माहिती घेता घेता वैभव राऊतचा सनातनच्या या आश्रमातील वावर ठळकपणे लक्षात आला. त्यातूनच पुढे त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवण्यात आली. तेव्हा रात्रीच्या वेळी अनेक व्यक्ती त्याच्या बंगल्यावर येतात. बराच वेळ थांबतात आणि मध्यरात्री किंवा पहाटे बाहेर पडतात, असे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढत गेला. त्यातूनच त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर पुणे?

एटीएसने वैभव राऊतला स्फोटकासह अटक केल्यानंतर पुण्यासह, सातारा, सोलापूर येथे घातपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर दहशतवादी संघटनांबरोबरच आता हिंदुत्ववादी संघटनांच्या रडारवर पुणे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शरद कळस्कर याच्या घरातून बॉम्ब बनवण्याविषयी मार्गदर्शन करणा-या दोन चिठ्ठय़ा सापडल्या आहेत. या दोघांच्या संपर्कात असलेल्या सुधन्वा गोंधळेकर याचाही कटात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर त्यालाही पुण्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर पुण्यासह सातारा, सोलापूर येथे घातपात घडविण्याचा कट असल्याचे समोर आले आहे.

दाभोलकर-पानसरे हत्येशी संबंध आहे का, याची तपासणी
एटीएसने अटक केलेल्या तिघांचा ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे काय हेदेखील तपासून पाहण्यात येणार आहे.

सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगावसारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठा मोर्चात घातपातासाठी स्फोटके तयार होत होती : आव्हाड
वैभव राऊतच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केला आहे. नालासोपारा येथे वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे. इतकेच नाही तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे वकील संजीव पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी आग्रही मागणीही आव्हाडांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version