Home महाराष्ट्र कोकण मेवा नव्या ऊर्जेचा नवा अनुभव

नव्या ऊर्जेचा नवा अनुभव

0

दिवस बदलतो तसा निसर्गही बदलतो आहे. थोडय़ा फार प्रमाणात तुम्हीही बदलत असाल. कारण प्रत्येकी दिवशी एक नवा अनुभव असतो.

दिवस बदलतो तसा निसर्गही बदलतो आहे. थोडय़ा फार प्रमाणात तुम्हीही बदलत असाल. कारण प्रत्येकी दिवशी एक नवा अनुभव असतो. नव काही आपण शिकत असतो. तोच निसर्ग, तिच फुलं, नव्या दिवसाला नवी वाटतात. पळसही असाच. आता तो रक्ताळलेला झाला आहे. रानावनात दिमाखात उभा असलेला हा पळस अगदी झाडांच्या भाऊगर्दीतही दूरवरून आपले लक्ष वेधून घेतो. अशी अनेक फुले आहेत, त्यांचे नुसते दर्शन झाले तरी उत्साह काटोकाट भरून येतो. काही फुलांच्या गंधाने येणारा टवटवीतपणा शरीराला शिकवावा लागत नाही. या दिवसातच जरा निसर्ग भ्रमंती करायला हवी. भरदुपारी जाणे शक्यच नाही. रणरणत्या उन्हात आपण कधी तडकून जाऊ हे समजणारही नाही. पण पहाटेच्या भ्रमंतीची आल्हादायकता अनुभवायला हरकत नाही. कोकीळाचा मंजुळ आवाज कानी पडेल. उन्हाची रखरख आता वाढणार आहे. याचे सकाळच्या प्रहरी यत्किंचितही मागमूस मिळणार नाही. तलावाकाठी फिरायला जायचे तर तलावच लालसर केशरी रंगाचे दिसू लागते.

आतासे डोंगर दरी भ्रमंतीस अधिक चांगले. रानमेव्याचे ताट आपल्यासाठी सज्जच असते. आपण कसे खातो यावर त्याची लज्जत ठरलेली. म्हणजे बघा.. करवंद  थेटही खाता येतात किंवा त्याला मीठ मसाला आणि गूळ एकत्र करून करवंदाच्या इवल्याशा दोन फोडी जिभेवर ठेवल्या की जिभ चुरचुरते आणि डोळे आपोआप गच्च मिटले जातात. एक मिठास लज्जत अनुभवायला मिळते. या करंवदांबरोबर चाराबोरे, जांभूळ, तोरणे, रतांबे, आटके, काजूचे बोंड आणि हरत-हेची फळे आपल्यासाठीच असतात मात्र, ज्याचा त्याचा स्वाद कसा घ्यावा याची एक थिअरी ठरलेली असते. जंगल नुसत चालून समजत नाही. त्यासाठी दिशा समजायला हवी. झाडापेडांशी बोलता यायला हवे. काही झाडे आपल्या तो-यात खेटून उभी असतात. त्यांच्यासमोर मान झुकवूनच जायला हवे. काहींना हळुवारपणे बाजूला करायचे तर काहींच्या फंदातच न पडलेले बरे! तोरणे खाण्यास चांगली पण झाडाची कळ काढली तर जन्माची अद्दल घडायची. त्याचा एक काटा आयुष्यभर व्रण ठेवून राहतो. यावेळी नवख्यालाही आपलेसे करते ते रतांबी.. ये बाळा ये बाळा असंच जणू ते सांगत असते. या चाराबोरांच्या झाडाबरोबर मजा करताना हळवी असतात. त्यांना राग राग केलेला चालत नाही. चटकन तुटून खाली येतात ती..

उन्हाळय़ाची चाहूल जाणवताच पानगळीत वृक्षराई गायब झाली होती. एकही पान नसलेले झाड त्यावेळी लक्ष वेधून घेत होत. त्या झाडावर आता लाल रक्तासारखा सडा बहरला होता. गुलमोहरही पिवळय़ा लालफुलांनी मोहरून गेला होता. प्रत्येकाची ऐट ठरलेली. पळसाचे एक वैशिष्टय़ तुम्हाला माहिती असेलच. इतर झाडांचा आकार ठरलेला असतो. पळस मात्र मनाला येईल तसा वाढलेला आणि वळलेला. पळस म्हणजे सृष्टीसौंदर्याची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर सांभाळणारा एक वृक्ष वाटतो. रक्ताळलेल्या पळसाकडे पाहिले की अनेक साक्षात्कार होऊ लागतात. कवीमन जागृत होते. असे कवीमन जागृत करणारी अनेक झाडे आहेत. यावर्षी कारवीलाही काटा आला. नाहीतर निळय़ा फुलांचा सडाच सहय़ाद्रीला झाकून टाकतो.

उन्हाची काहिली वाढत असली तरी एकदा का राईत पाऊल ठेवले की, ऊन कुठच्या कुठे पळून जाते. आणि मग हय़ा झाडाखाली झोपू की त्या झाडाखाली असे वाटू लागते. चिमण्यांचा किलबिलाट आपल्याला शांत झोपू देईल का? याची शाश्वती नाही. एक मात्र खरे की तुम्ही त्या गुंजनातही आनंदीत राहता. एक नवा अनुभव, नवी ऊर्जा तुम्हाला मिळालेली असते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version