Home टॉप स्टोरी नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक २२ एप्रिलला

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक २२ एप्रिलला

0

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसह सात नगरपालिकांच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली.

मुंबई- नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसह सात नगरपालिकांच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी सोमवारी केली. या निवडणुकीची आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, राजगुरुनगर, वरणगाव, भोकर, वाडी आणि मोवाड यांच्यासह अन्य महापालिकेच्या दहा रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीचा अर्ज भरण्याची सुरुवात ३१ मार्च रोजी होईल. ८ एप्रिलला अर्जाची छाननी तर १० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या निवडणुकीची मतमोजणी २३ एप्रिलला होणार आहे, असे आयोगाने जाहीर केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या १११ प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिल २०१५ पर्यंत नामनिर्देशन पत्रे दिली व स्वीकारली जातील. ८ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल, त्यानंतर लगेचच नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. १० एप्रिल  रोजी दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.

११ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याचदिवशी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील; तसेच मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होईल. २३ एप्रिल  रोजी सकाळी १०पासून मतमोजणी सुरू होईल.

आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील. छाननीच्या वेळी मूळ जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र तपासण्याकरीता सादर करावे लागेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणा-या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ते कार्यवाही करतील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेत सध्या ९९ नगरसेवक आहेत. मात्र, यंदा यात १४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या औरंगाबाद नगरपालिकेत ९९ नगरसेवकांवरून ११३ अशी संख्या असेल. सातारा- देवळाई भाग आता मनपात समविष्ट झाल्याने नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

२०१० साली झालेल्या निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेत पक्षीय बलाबल…

राष्ट्रवादी- ५६
काँग्रेस- १३
शिवसेना-१६
भाजप-१
इतर-४

२०१० मध्ये औरंगाबाद महानगपालिकेत पक्षीय बलाबल…

शिवसेना-३०
भाजप – १५
कॉंग्रेस – १९
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ११
शहर प्रगती आघाडी (जयस्वाल गट) – ३
भारिप-बहुजन महासंघ – २
रिपब्लिकन डेमोक्रॅटिक – २
मनसे – १
अपक्ष – १६

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version