Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती नवरात्रींचे रंग निराळे

नवरात्रींचे रंग निराळे

0

आपल्या हिंदू धर्मात सणांना आणि उत्सवांना महत्त्व आहे. आता लगबग सुरू झाली आहे, ती नवरात्रोत्सवाची! नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचं पूजन केलं जातं. अद्वितीय उत्साहाने हा सण साजरा केला जातो. महिलाही नऊ दिवस प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगानुसार साडया नेसतात. नवरात्र हा एकमेव असा उत्सव आहे, ज्यात महिलांना सर्वाधिक महत्व मिळतं. देवीच्या तयारीबरोबर महिला स्वत:सुद्धा ठरलेल्या रंगानुसार उत्तमोत्तम साडया नेसतात. पण ब-याच जणांची अशी मान्यता आहे, की ठरलेल्या रंगानुसार वस्त्र परिधान केलं नाही तर पाप लागतं किंवा देवीचा कोप होतो. तर या सगळ्या गोष्टी ख-या आहेत का, हे रंग कसे ठरतात, त्यामागे शास्त्रीय कारण आहे, की धार्मिक कारण आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं.

नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा. कारण धान्य जमिनीत पेरल्यानंतर नऊ दिवसानंतर त्याला अंकुर येतो. तसंच गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसानंतर मुल जन्माला येतं. याचं आणखी एक शास्त्रीय कारण म्हणजे सगळ्यात मोठा आकडा हा नऊ आहे. अशा नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांचं दर्शन घडतं. त्याचप्रमाणे या नऊ दिवसांत स्त्रियाही नवरंगातील वस्त्रं किंवा साडया परिधान करतात. हा कल काही पुरुषांमध्येही दिसून येतो. अगदी वृत्तीने फारशा धार्मिक नसणा-या व्यक्तीदेखील नवरात्रीतल्या या रंगांच्या क्रमावारीचं पालन करताना दिसतात. खरं तर ही पद्धत अलिकडचीच, म्हणजे गेल्या दशकभरातली. अगदी जुन्या काळात रंगांनुसार कपडे घालण्याची पद्धत प्रचलित नव्हती. मग ही प्रथा मुळात आली कुठून? ती का पाळली जातेय?

असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात येतही असतील. वास्तविक याला कोणताही शास्त्राधार नाही, असं यासंदर्भात बोलताना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ते म्हणतात, ‘‘रंगांचा धर्माशी काही एक संबंध नसतो. शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही की महिलांनी ठरलेल्या वारानुसार साडी नेसावी. समजा त्या ठरावीक रंगाची साडी ठरावीक दिवशी नेसली नाही तर मला पाप लागेल आणि देवीचा कोप होईल किंवा माझं भविष्य बदलेल, अशा काही चुकीच्या समजुती जनसामान्यांमध्ये आहेत. खरं तर अशा समजुतींचा आणि रंगाचा काहीही संबंध नाही. ज्या दिवशी जो रंग आहे त्या दिवशी त्या रंगाचं वस्त्र एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला दान करावं. त्याने पुण्य मिळतं आणि केलेलं दान कोणासमोर सांगू नये, असं शास्त्र सांगतं.

आताच्या महिला त्या त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं वस्त्र नेसतात ही आवड त्यांच्या स्वेच्छेतून आलेली आहे. त्याला कोणतंही धार्मिक उद्दिष्ट नाही. खरं तर त्याला सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. म्हणजे एकाच रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे महिलांमध्ये समानता आणि एकता निर्माण होते. एखाद्या गरीब महिलेने नेसलेली साडी आणि एका श्रीमंत महिलेने नेसलेल्या साडीत त्यांच्या मूल्याचा फरक असला तरी रंगाचा नसतो म्हणून सगळ्या महिला समान आहेत, असा संदेश त्यातून मिळतो. या उत्सवामुळे महिलांना निर्मितीचा आनंद मिळतो. साडय़ांचा रंग एक असल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. मी एकटीच नाही तर माझ्यासारख्या अनेक जणी आहेत ही भावना त्यांच्यात एकोपा निर्माण करते. सर्व स्त्रियांच्या वस्त्रांचा रंग एकसमान असल्यामुळे एखाद्या महिलेबद्दल काही वाईट विचार केल्यावर, तिला हात लावला तर तिच्यासारख्या आणखी कित्येक महिला उभ्या राहतील, असा विचार दुष्ट शक्तींना आळा घालू शकतो. या सगळ्यामुळे महिलांमधला आत्मविश्वास वाढतो. या उत्सवाचं आणखी एक महत्त्व म्हणजे महिलांचे ३६५ दिवस चिंतेत आणि काळजीत जातात. या त्रासापासून थोडा वेळ आनंद मिळावा म्हणून हा सृजनाचा उत्सव साजरा केला जातो.

शब्दांकन : श्रद्धा कदम-पाटकर

नवरात्रानिमित्त दिव्य सूर्ययाग

मुंबईतील गोरेगावमधील श्री गजानन महाराज (शेगाव) मंदिरातर्फे २५ ते २९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत दिव्य सूर्ययागाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेषत: मुंबईकरांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात शांततापूर्ण आध्यात्मिक अनुभूती घेता यावी, यासाठी हा सूर्ययाग केला जाणार आहे. श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या गोरेगाव विभागातील मंदिराच्या प्रांगणात हा सूर्ययाग होणार आहे.

डॉक्टर स्वरूप प्रामाणिक व भाग्यश्री प्रामाणिक हे या यागाचे प्रमुख यजमान आहेत. या यागाचे मुख्य आचार्य प्रेमनाथ शुक्ल असतील. घटस्थापनेच्या दिवसापासून पंचमीपर्यंत पाच दिवस हा सूर्ययाग असणार आहे.

हिंदू संस्कृतीनं मान्य केलेल्या पंचदेवतांमध्ये सूर्यदेवतेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सा-या विश्वाची घडी ही सूर्यावर अवलंबून असते. सूर्यकिरणांद्वारे मिळणा-या सकारात्मकतेची अनुभूती सर्वाना घेता यावी यासाठी योजिलेल्या या सूर्ययागामध्ये सहभागी झाल्यास तेथील प्रार्थनेतून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशा सर्वच स्तरांवर आपणास उन्नत अनुभव येईल. या पंचकुंडीय यागातील प्रमुख कुंड बारा कोन असलेल्या चांदणीच्या आकाराचा आहे. या यागात इतर समिधांबरोबर मंदार वृक्षाच्या फुलांचा, पानांचा आणि समिधांचा हविद्रव्य म्हणून उपयोग केला जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version