Home कोलाज जन्मांतरी केले अवघे व्यर्थ झाले नरहरी महाराज

जन्मांतरी केले अवघे व्यर्थ झाले नरहरी महाराज

0

दैनंदिन जीवन जगताना आपल्या हातून अनेक ब-या-वाईट गोष्टी घडतात. त्यांचा विचार कधीतरी शांतपणे बसून आपण करतो का? तो कधीतरी करायलाच हवा. 

दैनंदिन जीवन जगताना आपल्या हातून अनेक ब-या-वाईट गोष्टी घडतात. त्यांचा विचार कधीतरी शांतपणे बसून आपण करतो का? तो कधीतरी करायलाच हवा. आयुष्याचा हा हिशेब नि जमा-खर्च यासाठी मांडायचा की यापुढील आयुष्याचा हिशेब तरी नीट जमावा. नीट मांडता यावा. असं झालं नाही तर आयुष्याचं सारं गणितच विस्कटून जाणार नाही का? वेळीच हे केलं नाही तर ते चित्र बदलायला उसंत तरी मिळेल का?

तेव्हा आजवरच्या जीवनाचा असा झाडा घेणं, आपल्याच हिताचं असतं. यासाठीच संतांनी ‘अनुताप’ आणि ‘उपरती’ यांना आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं आहे. यासाठीच रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले, करुणाष्टकं लिहिली नि तुलसीदासांनी ‘विनयपत्रिका’ लिहिली. संत नरहरी सोनारांचा हा अभंगही आयुष्याची अशी झाडाझडती घेतो, जमा-खर्च मांडतो नि उपरतीची जाणीव करून देतो.

पापांचे पर्वत मोठमोठे झाले।
शरीर नासले अधोगती।।
जन्मांतरी केले, अवघे व्यर्थ गेले।
देह हो नासले क्षणामाजी।। १।।
जिणे अशाश्वत, देह नाशिवंत।
अवघे सारे व्यर्थ असे देखा।।
काही नाही दान, काही नाही
पुण्य। जन्मासी येऊन व्यर्थ जाय।। २।।
परोपकार काही नाही केला
देवा। सद्गुरू केशवा हृदयी घ्यावा।।
सारामध्ये सार, नाम असे थोर।
हृदयी निरंतर नरहरीच्या।। ३।।

आपलं आयुष्य किती आहे, हे कुणाला तरी सांगता येईल का? आजवरच्या आयुष्याची मोजदाद आपल्याला करता येते. दर वाढदिवसाला आपण ती करीत असतो पण पुढचे किती वाढदिवस येणार आहेत, हे कुणाला सांगता येईल? त्यामुळे आपण प्रारब्धवादी किंवा दैववादी व्हावं असा याचा मुळीच अर्थ नाही. संतांनाही तो अभिप्रेत नाही.

हे जीवन शाश्वत नाही, हे आपल्याला कुणी सांगण्याची आवश्यकता नसते. हा देह कधीतरी जन्मला नि तो कधीतरी इथंच टाकून द्यावा लागणार, हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. ते विसरून कसं चालेल? मग हे जीवन सत्कारणी लावण्यासाठी काय करावं?

‘अवघे सारे व्यर्थ असे देखा’ असं जरी संत म्हणत असले तरी तुम्हा-आम्हाला तसं म्हणता येत नाही. कारण आपल्याला प्रपंचाची कर्तव्य पार पाडावीच लागतात. ‘हे सारं व्यर्थ आहे’ म्हणून नोकरी सोडता येईल का? उद्योगधंदा सोडता येईल का? मुलं बाळं नि संसार सोडता येईल का? मुळीच नाही.

तसं करणं साधकांना नि संतांना शक्य असलं तरी सामान्य माणसाला शक्य नाही, याची संतांनाही कल्पना आहे. पारमार्थिक साधनेप्रमाणेच ऐहिक जीवनालाही काही अर्थ आहे असं त्यांना वाटतं म्हणूनच आपण हा संसार प्रपंच चांगल्या प्रकारे करावा, गृहस्थाश्रमाची कर्तव्यं नीट पार पाडावीत, उरलेलं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करावं, आजवर पापं केली असतील तर ती यापुढं तरी करू नयेत. ‘जन्मासी येऊन व्यर्थ जाय’ अशी आपली स्थिती होऊ नये, काही दान-पुण्य करावं, परोपकार करावा, सत्कृत्यं करावीत, असं संत नरहरी महाराज म्हणतात.

याचा अर्थ असा, की यापुढं तरी आपलं जीवन निर्मळ होईल, यासाठी काही प्रयत्न करायला आपण आजपासूनच लागलं पाहिजे. जीवनातले नकार पुसावेत, होकार गिरवावेत. अंधार नाहीसा करावा, प्रकाशाची वाट न्याहाळावी.

आजवर जे आपल्या हातून चांगलं घडलं नाही, याबद्दल खेद करीत बसण्यापेक्षा यापुढं तरी काही चांगलं घडावं, याची प्रेरणा मनात निर्माण व्हावी. मग रोजच ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ अशीच आनंदमय स्थिती आपल्याला अनुभवता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version