Home महाराष्ट्र कोकण ध्यास जिल्हावासीयांच्या आरोग्याचा!

ध्यास जिल्हावासीयांच्या आरोग्याचा!

0
narayan rane

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ज्या समाजाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आपल्या जडणघडणीस हातभार लावला यासाठी नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांना विशेष महाशिबिरात पाचारण करण्यात आले आहे. 

वेंगुर्ले – समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ज्या समाजाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आपल्या जडणघडणीस हातभार लावला, याची जाणीव ठेऊन जिल्हावासीयांना सहज सुलभपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून घेता यावी, यासाठी नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांना विशेष महाशिबिरात पाचारण करण्यात आले आहे. कै. नारायण ऊर्फ नाना मांजरेकर यांच्या सामाजिक प्रेरणेतून व आमचे मित्र संदेश पारकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कै. नारायण ऊर्फ नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्ताने शिरोडा येथे १० जानेवारी रोजी भव्य असे जिल्हास्तरीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्योगमंत्री नारायण राणे, प. पू. अण्णा राऊळ महाराज, खा. डॉ. निलेश राणे, स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे, संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नामवंत २०० डॉक्टर सहभागी होणार असून सुमारे १५ हजार रुग्णांची तपासणी होईल, एवढी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत ऊर्फ बाप्पा मांजरेकर यांनी दिली.

‘एक व्रत गरीब व गरजूंच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या तिस-या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हे मोफत आरोग्य शिबिर शिरोडा येथे होत आहे. तेथे यशयोग बंगल्यानजीक बायपास रोडवर १५ हजार रुग्णांची व्यवस्था होईल असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या शिबिराचे उद्घाटन दुपारी १२ वाजता होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी ई रवींद्रन, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, शिरोडा सरपंच विशाखा परब, उपसरपंच प्रवीण धानजी तसेच कार्यकर्ते, जिल्ह्यातील प्रमुख नेते आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

ट्रस्टच्या वतीने समाजात चांगले काम करणा-या संस्था व व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये आंबोली येथील बाबल आल्मेडा यांचा साहस ग्रुप, अणाव दाबाचीवाडी येथील आनंदवृद्धाश्रम, नेरुर येथील सी. बी. नाईक यांचे वसुंधरा विज्ञान केंद्र, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शशिकांत अणावकर यांच्यासह अन्य उत्कृष्ट काम करणा-यांचा यामध्ये समावेश आहे. या सत्कारातून समाजातील अन्य व्यक्तींनी बोध घ्यावा हा या सत्कारामागे ट्रस्टचा उद्देश आहे. दरम्यान, या शिबिरासाठी उपस्थित राहणारे जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांचा शिरोडा भंडारी समाजाच्या वतीने तसेच माऊली देवस्थान व व्यापारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तरी या मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत ऊर्फ बाप्पा मांजरेकर व उपाध्यक्ष योगिता मांजरेकर यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version