Home महामुंबई ठाणे धरणे बांधण्यापेक्षा गावांमधील जलसाठे शुद्ध करा

धरणे बांधण्यापेक्षा गावांमधील जलसाठे शुद्ध करा

0

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे रायगड जिल्ह्यात विहीरींचे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. 

अलिबाग- मोठमोठी धरणे बांधण्यापेक्षा गावांमध्ये असलेले तलाव, ओढे, विहिरी यांसारख्या नसर्गिक जलसाठयांमध्ये साचलेला गाळ काढून ते पाणी शुध्द करा, पाण्याचे पुनर्भरण करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवा, दरवर्षी अशी कामे केल्यास पाण्याचा प्रश्न काही वर्षामध्ये सुटू शकेल, असे मत ज्येष्ठ निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे रायगड जिल्ह्यात विहीरींचे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात बुधवारी अलिबाग तालुक्यातील खंडाळे गावातून करण्यात आली. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते या अभियानाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सचिनदादा धर्माधिकारी बोलत होते. राहुलदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता कावजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सचिनदादा धर्माधिकारी आपल्या भाषणात म्हणाले की, पाणी ही सर्वाची गरज आहे. पाणी मिळावे म्हणून सरकारही काम करते, विविध योजना रावबते. मात्र त्यात लोकांचा सहभाग नसतो. त्यामुळे योजना यशस्वी होत नाहीत.

या कामात लोकांनी सहभाग घेतला पाहिजे, सरकार करेल म्हणून न थांबता आपण काम केले पहिजे, आपल्या गावातील जलसाठे गावातील लोकांनीच स्वच्छ केले पाहिजेत. पाण्याच्या प्रश्नावर जनजागृती व्हावी, या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठीच ही विहीर स्वच्छ मोहिम सुरू करण्यात आली आहे.

कामाचे श्रेय मिळविण्यासाठी काम करू नका, एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करा, जनजागृती करा. या माहिमेत जनतेचा सहभाग वाढवून या मोहिमेला चळवळीचे रूप द्या, सरकारवर अवलंबून न राहता आपल्यातील ताकतीवर विश्वास ठेवून कामाला लागा, बडबड करण्यापेक्षा आपल्या कामातून बोला, कृती करून दाखवा. असे केले तर आपले हे काम समाजाला दिशा देणारे ठरेल, असे सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले.

विहीर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात ५०० विहीरींतील गाळ काढून त्या स्वच्छ करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४८ विहिरी स्वच्छ करण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यात उर्वरित विहिरी स्वच्छ केल्या जातील. ही सुरूवात असून हळूहळू हे काम संपूर्ण महाराष्ट्रात केले जाईल, असे सचिनदादांनी यावेळी जाहीर केले.

पाणी जसे जीवन आहे तसे ते मरणही आहे. शुध्द पाणी आपले आरोग्य वाढवते. अशुध्द पाणी आपला जीव घेते. त्यामुळे पाणी शुध्द राहिले पाहिजे, यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी काढले.

तर महाराष्ट्रातील दुष्काळावर केवळ चर्चा न करता डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. हे काम टंचाईवर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे किशोर धारिया म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version