Home महामुंबई देशाची शान ‘तिरंगा’ बनवण्याचा अभिमान

देशाची शान ‘तिरंगा’ बनवण्याचा अभिमान

0

बोरिवली कोरा केंद्र येथील ‘मुंबई खादी ग्रामोद्योग संघ’ गेल्या अनेक वर्षापासून खादीपासून तिरंगा ध्वज बनवत आहे.

मुंबई- बोरिवली कोरा केंद्र येथील ‘मुंबई खादी ग्रामोद्योग संघ’ गेल्या अनेक वर्षापासून खादीपासून तिरंगा ध्वज बनवत आहे. याचबरोबर खादीपासून शर्ट, कुर्ता, पायजमा, टोपी याचे उत्पादन खादी ग्रामोद्योगमध्ये केले जाते.

यासाठी खादी ग्रामोद्योगमध्ये ४०० कर्मचारी वेगवेगळ्या विभागात काम करत आहेत. खादी ग्रामोद्योगमध्ये खादीपासून बनवण्यात येणा-या ध्वज व इतर उत्पादनांमुळे अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाचा ध्वज बनवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे तेथील कामगारांनी सांगितले.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांनी ‘मुंबई खादी ग्रामोद्योग संघ’ या संस्थेची स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना केली.

जास्तीत-जास्त नागरिकांना रोजगार मिळावा, हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वज मोठया प्रमाणात बाजारात दिसतात. ध्वज तयार करण्यासाठी खादी ग्रामोद्योगातील कर्मचारी तीन महिन्याअगोदरपासून काम करण्यास सुरुवात करतात.

नुसतेच, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनांकरिताच ध्वज उपलब्ध होतात असे नाही, तर वर्षभर ध्वज बनवण्याचे काम सुरू असते. सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालयं, संस्था, मंडळं, नागरिक येथून मोठया प्रमाणावर ध्वज खरेदी करतात. ध्वज तयार करताना नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. ध्वज तयार करताना तिरंगाचा रंग, कापड, माप हे योग्य पद्धतीने तयार केले जाते.

विशेषत: तिरंगामधील अशोक चक्र योग्यरित्या तयार करण्यात येते. त्यानंतर तयार झालेल्या ध्वजाची पडताळणी केली जाते. प्लास्टिकच्या ध्वजाचे उत्पादन खादी ग्रामोद्योगमध्ये केले जात नाही. खादी ग्रामोद्योगमध्ये लहान आणि मोठे अशा दोन्ही आकाराचे ध्वज बनवले जातात. १४२१ फुटांचा सर्वात मोठा ध्वज बनवण्यात आला असून २३ इंचाचा लहान ध्वजही तयार करण्यात आला आहे.

नागरिक, मंडळं, कार्यालयं, संस्था या मोठया संख्येने ध्वज खरेदीला येत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. नागरिक उत्साहाने आपल्या घरी, कार्यालयात, गाडीमध्ये ध्वज लावतात. त्यामुळे ध्वज बनवण्याचे काम आमची संस्था आणि कर्मचारी हे पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत, अशी भावना मुंबई खादी ग्रामोद्योग संघाच्या वरिष्ठांनी यावेळी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version