Home महामुंबई देवेंद्र फडणवीस यांचे सब कुछ २०१९! आता काय करणार ते सांगा!

देवेंद्र फडणवीस यांचे सब कुछ २०१९! आता काय करणार ते सांगा!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही कार्यक्रमाला जातात, तेव्हा मुंबई मेट्रोपासून ते नवी मुंबई विमानतळापर्यंत आणि शिवस्मारकापासून ते मुंबई-नागपूर सहा पदरी मार्गापर्यंत सर्व काही २०१९मध्ये पूर्ण करणार म्हणतात.

मुंबई – राज्यात आलेले भाजपा सरकार म्हणजे नुसते घोषणाबाज सरकार ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही कार्यक्रमाला जातात, तेव्हा मुंबई मेट्रोपासून ते नवी मुंबई विमानतळापर्यंत आणि शिवस्मारकापासून ते मुंबई-नागपूर सहा पदरी मार्गापर्यंत सर्व काही २०१९मध्ये पूर्ण करणार म्हणतात. सध्या काय करणार ते सांगा ना, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तरी २०१८पर्यंत करा म्हणजे पुढच्या वेळी तुमची शिवसेनेसोबत युती होईल, अशी कोपरखळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. आपल्या सव्वा तासाच्या भाषणात त्यांनी कधी शिवसेनेची टोपी उडविली, तर कधी मंत्र्यांची फिरकी घेतली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना जयंत पाटील यांनी सभागृह जिंकले. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात कोणताही नवा मुद्दा नाही. आघाडी सरकारच्या काळातील योजनांना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची नावे देण्याचा एकमेव कार्यक्रम भाजपा सरकारने आखला आहे. राज्यात दुष्काळ असताना शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस घोषणा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र जिथे जातात तिथे जोरदार घोषणा करतात. मात्र आता काय करणार हे सांगत नाहीत, तर सब कुछ २०१९मध्ये करणार असे सांगतात. मुंबई विमानतळ- २०१९, ट्रान्स हार्बर रोड- २०१९, मुंबई-नागपूर सहा पदरी रोड- २०१९, मुंबई मेट्रो टप्पा ३.. कधी पूर्ण करणार तर २०१९! त्याचे कारशेड आरे कॉलनीत उभे करण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे. आता त्यांना कसे पटवणार, हे एक कोडेच आहे (हशा). अर्थात, त्यांना पटवण्याची कला मात्र फडणवीस यांना चांगली आवगत आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या भाषणात त्यांनी ‘वाघाच्या जबडय़ात हात घालून, दात मोजण्याची भाषा केली.’ आणि निवडणूक संपली की पुन्हा गोंजारले. जरा वळवळ सुरू झाली की पुन्हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लावली, म्हणजे शिवसेनेला किती गोंजरायचे हे त्यांना चांगले जमले आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तरी २०१९ऐवजी २०१८मध्ये करा म्हणजे पुढच्या वेळी युती करता येईल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना पवारांचाच सल्ला लागतो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय अधिका-यांवर विश्वास नाही. त्यामुळे एमपीएसी परीक्षा पास झालेल्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या माणसांना ओएसडी म्हणून घेतले आहे. त्यात भाजपाच्या पदाधिका-यांच्याच जगण्याची सोय केल्याचे दिसून येते. त्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एकंदर आठ व्यक्ती खासगी असल्याचे सांगितले. त्यातील अभिमन्यू पवार आणि श्रीकांत भारती हे दोघेही भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी होते, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी या दोघांना सल्लागार म्हणून नेमले आहे. हे दोघे कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, तेवढे मुख्यमंत्र्यांनी सांगावे म्हणजे आम्ही त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू, असे जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, मीच त्यांना तुमच्याकडे पाठवतो. त्यावर पाटील म्हणाले, ठीक आहे, पाठवा. मी त्यांना जेवू घालतो. यावर मुख्यमंत्री म्हणाले, घाला घाला, एखाद्या पवाराला जेवू घातल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. त्यावर जयंत पाटील म्हणाले, हो हो घालतो जेवू.. पण यानिमित्ताने एक सिद्ध झाले आहे की तुम्हाला पवारांचाच सल्ला लागतो.. कधी अभिमन्यू पवारांचा कधी त्या पवारांचा.. असे जयंत पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version