Home महाराष्ट्र कोकण मेवा देवगडचा हापूस ‘लज्जतदार’ पण..

देवगडचा हापूस ‘लज्जतदार’ पण..

0

देवगड हापूस हा मूळ रत्नागिरी हापूस म्हणूनच लावण्यात आला. मात्र, येथील जमिनीशी देवगड हापूसची चव, रंग व अन्य घटक जोडले गेले आहेत. यामुळे देवगड हापूसचे नाते, देवगडच्या मातीशी आहे. जातीशी नाही. म्हणूनच हापूस हा ब्रँड कायम राहणार आहे.

देवगड हापूसचे वैशिष्टय़ जाणताना, हापूस तयार होण्याची प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे. या प्रक्रियेनुसार मोहोर फुटण्यासाठी ताण मिळणे ही महत्त्वाची प्रक्रिया व्हावी लागते. कलमांना वर्षातून तीनदा ते चारदा पालवी येते. मात्र, पावसानंतर झाडाचा पाणीपुरवठा कमी झाल्यावर पालवीऐवजी मोहोर येतो. पाऊस संपल्यावर थंडी सुरू होते. ही थंडीही मोहोराला पोषकच असते. मोहोराला छोटे आंबे म्हणजे कणी आल्यावर उन्हाळा सुरू होतो व उष्णतेवर आंबा पोसला जातो. आंब्याचे हे चक्र निसर्गाशी जोडले आहे. देवगडबाबत आता काय होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. राजापूर तालुक्यातील जैतापूरपासून पुढे अगदी आच-यापर्यंत असलेला भाग हा कातळी भाग आहे.

साहजिकच या भागात कातळ फोडून आंब्याची लागवड शेतकरी करतो. कातळातील उच्च दर्जाची खनिजे आंब्याला मिळतात. त्याचबरोबर कातळामुळे झाडाला मिळणारा ताण सप्टेंबर, ऑक्टोबरलाच मिळतो व मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. लवकर आलेला मोहोर देवगड हापूसला चांगला दर मिळवून देतो. कारण देवगड हापूस सर्वात आधी मार्केटमध्ये गेलेला असतो. याउलट रत्नागिरी, वेंगुर्ले, मालवण भागात असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो व मोहोराऐवजी पालवी येते. ही पालवी जून होऊन पुन्हा मोहोर येण्यास बरेच दिवस जातात. साहजिकच आंबा तयार होण्यास उशीर होतो. देवगड हापूसचे नाते, हे असे मातीशी जोडले आहे. निसर्गाशी जोडले आहे. यामुळे निसर्ग बिघडला की, सर्व गोष्टी बिघडतात व साहजिकच आंबा पीक धोक्यात येते. एकूण सरासरी विचार करता, आंबा लागवड ही अपयशी ठरलेली लागवड आहे काय? असा प्रश्न बागायतदार विचारत आहेत. कारण यंदाचे वर्ष वगळता, गेली पाच वर्ष हापूस आंबा उत्पन्न देऊ शकला नाही. जर पाच वर्ष हवामान तसेच राहत असेल, तर हवामानात बदल झाला आहे असे म्हणावे लागेल.

साहजिकच आता नवीन संशोधन झाले पाहिजे. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळे हापूसचे प्रकार काढण्यात आले. यात रत्ना हापूस, बाटली हापूस असे अनेक प्रकार काढण्यात आले. मात्र, त्याला म्हणावे तेवढे यश येऊ शकले नाही. कारण हापूसची चव इतर हापूस घेऊ शकले नाहीत. सर्व गुणवैशिष्टय़े ठेवून हापूसमध्ये बदल केले पाहिजेत. जेणेकरून बदलत्या हवामानालाही हा हापूस तग धरू शकेल. परसात रुजून आलेला रायवळ हापूस कुठल्याही हवामानाला टिकतो. बहरतो. मग हापूस हीच जात एवढी नाजूक कशी? हा प्रश्न निर्माण होतो आहे. २००८ सालात होणा-या मेळाव्यामध्ये हापूसची कलमे तोडून टाकून नवीन लागवड करावी की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोग आटोक्यात आणायचे असतील तर शास्त्रज्ञांनी सुचविलेले उपाय अंमलात आणायला हवेत. त्यांनी आंबा बागेत २५ टक्के इतर जातीची लागवड करा, असे सांगितलेले आहे. मात्र, केवळ हापूसच लावल्याने मोनो कल्चर निर्माण झाले आहे. बेसुमार फवारण्या झाल्याने मित्रकिडी नष्ट पावल्या. आंब्याचे परागीकरण मित्रकिंडींमुळे होते. आंब्याच्या बेसुमार फवारण्या मित्रकिडीही नष्ट करीत आहेत. आंबा पीक कमी येण्यामागे हे सुद्धा कारण झाले आहे. यामुळे मधुमक्षिका पालनासारखा जोड व्यवसायही केला पाहिजे. जेणेकरून परागीकरण होऊ शकेल.

आंब्याची बहुतांशी हानी वाहतुकीदरम्यानच होते. याला कारण बागायतदारांचे पॅकिंग हा विषय आहे. योग्य पॅकिंग असेल तर आंब्याची हानी होत नाही. तसेच ट्रक भरल्यावर ताडपत्री घालताना अथवा दोरखंड आवळताना, पार्सलच्या वर हमाल नाचत असतात. यामुळे ब-याच वेळा कोरूगेटेड बॉक्समधील आंबे खराब होताना दिसतात. मात्र, वाहतूकदार ब-याचवेळा परतीचे भाडे देऊनही ट्रंका गहाळ करतात, अशी समस्या सांगितली जाते. काहीवेळा वाहतुकीचे व्यवस्थापन करणा-या ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसला अंधारात ठेवून ट्रकधारक इतर सामान घेऊन येतात व त्याचे भाडे अलाहिदा वसूल करतात.

काही वेळा सामान जास्त असल्यास बागायतदारांच्या ट्रंका कमी भरल्या जातात. स्थानिक व्यवस्थापन करणा-या ट्रान्स्पोर्ट कंपनीला फारशी माहिती नसते. कारण बहुतांशी ट्रक हे सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील केवळ त्याच काळासाठी घेतले जातात. आंबा बागायतदारांना सर्वात मोठी समस्या आहे, ती अपघातग्रस्त झालेल्या ट्रकमधील नुकसान भरपाईची. काही मोजके वाहतूकदार आंबा पार्सलचा विमा उतरवून ट्रक अपघातग्रस्त झाल्यास त्याचे पैसे देतात. वास्तविक सर्व वाहतूकदारांनी एकत्र येऊन ग्रुप विम्याची रक्कम भरल्यास वाहतूकदारांना विमा उतरवता येईल व नुकसानभरपाई देता येईल.

देवगड, वेंगुर्ले, मालवण हे तीन तालुके ‘मँगो बेल्ट’म्हणून ओळखले जातात. मात्र, या तीनही तालुक्यांना सागरी वाहतूक करणे शक्य असूनही व ती कमी पैशात उपलब्ध होणे शक्य असतानाही याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. जलवाहतूक न होण्यास प्रामुख्याने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती नसणे हा तोटा आहे. कंटेनर पद्धतीची वाहतूक करणे हे सागरी वाहतुकीला सोयीचे होते. यामुळे कंटेनर पोर्ट निर्माण होणे गरजेचे आहे. वेंगुर्ले बंदरातून सुटलेली बोट सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील सर्वच आंबा एका दिवसात गोळा करून दुस-या दिवशी सकाळी इच्छित स्थळी नेऊ शकते. मात्र, पुरेशी कंटेनर पोर्ट निर्माण होणे गरजेचे आहे. तरच आंबा वाहतूक सक्षमपणे होऊ शकेल. सुरुवातीला एखाद्या कंपनीने प्रकल्प म्हणून हा प्रोजेक्ट राबवायला हरकत नाही. योग्य पद्धतीचे बंदर झाल्यास प्रिकुलिंग केलेले आंबे थेट परदेशात नेणे शक्य होणार आहे. यासाठी आंबा निर्यात केंद्र बांधले आहे. फक्त गरज आहे, ती आधुनिक पद्धतीने विचार करून शासन व बागायतदारांच्या सहकार्याची.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version