Home महाराष्ट्र कोकण मेवा दृष्टी देते दिव्यत्व

दृष्टी देते दिव्यत्व

0

आपल्या कोकणसृष्टीचं वैभवच सुंदर आहे. हिरवी हिरवी वनसृष्टी आपल्याला लुभावीत आहेत. द-याकंदरी खुणवीत आहेत. माळरानातले वळणावळणांचे रस्ते वाटा आपले आरक्त जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करताहेत. गाईचे हंबरणे.. वासरांचे उंडरणे डोळयात भरून साठवावे. पक्ष्यांचा किलबिलाट आभाळातला त्यांचा स्वैर विहार रंग आणि गंधाची उधळण करणारी विविधांगी फुले, ही फुले सायंकाळी गळून पडतात. सकाळी पुन्हा नव्या दमाने उमलून वास्तवांचे स्वागत करतात. आपल्याला या निसर्गाने सगळं भरभरून दिलं आहे.

आपल्या कोकण भूमीला विशाल सागर किनारा लाभला आहे. एक विलोभनीय किनारा.. झुलणारे ताडमाड, नारळी पोफळी, किना-यावरची भिजलेली मऊ मऊ वाळू.. फेसाळणा-या धुंद लाटा.. समुद्रावरून वाहणारे उबदार वारे. सगळंच मनमोहक आणि विलक्षण.. वाटतं या मऊ मऊ वाळूत पुन्हा डाव मांडावा.. खूप खेळावे. मस्त लोळावं अभेद्य असा दुर्ग बनवावा. सिंधुदुर्गासारखा! शिवरायांचं शौर्य, सामर्थ्य, मुत्सद्देगिरी आणि शिवरायांच्या स्वराज्याची स्वप्ने क्षणाक्षणाला उराशी बाळगून आपल्या जीवनाचं सोनं करावं. खेळताना बागडताना अशा महत्त्वाकांक्षी विचारांच्या नसत्या आठवणीने आजच्या मरगळलेल्या मनाला उभारी येते. या वलयाने मन पुन्हा पल्लवीत होते, टवटवीत होते.

सांजसमयीच्या सागर किनारी प्रत्येक सूर्यास्त पाहत राहावा.

सहयाद्रीच्या डेगेवरचा उष:काल आणि सागर क्षितिजावरचा सूर्यास्त कोणत्या विलक्षणात वर्णन करावा? एक धुंद सकाळ आणि एक रमणीय सायंकाळ, एक उष:काल आणि एक अस्तकाळ त्या क्षणांची रवीबिंबाची कंपायमान स्थिती या शब्दचित्रात कशी साकारावी? रवीबिंब अस्ताला गेलं तरी क्षितिज आणि अवघं आभाळ चित्रविचित्र रंगांनी भारून जातं.
रवीबिंब स्वत:च्या अस्ताआडून अवकाशाला आणि या सृष्टीला सजवीत राहतं! पशुपक्ष्यांना, झाडापेडांना, वृक्षवल्लींना आणि झुळझुळणा-या वा-यालाही या क्षणी ग्लानी येते. एव्हाना शांतपणे घिरटया घालणारे पक्षी अस्पष्ट होतात. या ग्लानीने स्वरूपातून अवघा सागर रक्ताळून जातो. या रक्तीमेतून उसळलेल्या लाटा समर्पण करतात! त्या समपर्णाची प्रक्रिया प्रामाणिक आहे. अवघं वास्तवच अशा समयी आपल्याशी बोलत राहातं.

आपल्या कोकणसृष्टीचं वैभवचं सुंदर आहे. हिरवी हिरवी वनसृष्टी आपल्याला लुभावीत आहे. द-याकंदरी खुणवीत आहेत. माळरानातले वळणावळणांचे रस्ते, वाटा आपले आरक्त जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करताहेत. गाईचे हंबरणे.. वासरांचे उंडरणे, डोळयात भरून साठवावे. पक्षांचा किलबिलाट, आभाळातला त्यांचा स्वैर विहार, रंग आणि गंधाची उधळण करणारी विविधांगी फुले, ही फुले सायंकाळी गळून पडतात.

सकाळी पुन्हा नव्या दमाने उमलून वास्तवांचे स्वागत करतात. आपल्याला या निसर्गाने सगळं भरभरून दिलं आहे. पण हे सगळं आपल्याला मुक्त मिळालं म्हणून त्याची किंमत आपल्याला कळत नाही. पण ब-याचअंशी माणूस हे ही विसरून जातो की हा निसर्ग आहे, म्हणून मी आहे, नव्हे आपण सारे आहोत. पण या निसर्गाचे एक घटक आहोत. या निसर्गाच्या साम्राज्यामध्ये आपली किंमत किती? या विशाल सागराच्या किना-यावर जरी आपण क्षणभर उभे राहिलो तरी त्याची दिव्यता आणि भव्यता पाहून आपण किती लहान आहोत की शून्य आहोत याची आपणास जाणीव होईल. आपले अस्तित्व एका को-या कागदावर पेनाने मारलेल्या ठिपक्या एवढेदेखील असणार नाही.

खरेच हा निसर्ग केव्हाही महान आहे! त्याच्या किमया, त्याचा करिष्मा महान आहे. तो किमयागार आहे! तो जादूगार आहे. त्याच्या त्या किमया, त्याची ती अनाकलनीय जादू काळीज भरून डोळयात साठवावी. आपल्या जाणिवांच्या कप्प्यात साठवून ठेवावी. त्याची किमया जादू पाहायला आपणाकडे एक सजल दृष्टी हवी. या ठिकाणी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ‘चारोळी’ आठवते. नुकतीच उमललेली गटार गडग्यातली एक पिंपळ फांदी त्यांना दिसली. तिचे ते रंगरूप पाहून त्यांना काय वाटले ते पहा.

गटार गडग्यात उमलली होती
एक तांबूस पिवळी पिंपळफांदी
मला वाटली
नव्या जगाची सूचक नांदी!

बंधूनो, या निसर्गात या कोकण भूमीच्या प्रेक्षपणात बरंच काही सूचक भरलं आहे. याचा आपण सर्वानी मिळून शोध घेऊया. एक उदाहरण सांगतो न्यूटनने एक फळ झाडावरून खाली पडताना पाहिले. त्याला उत्तर हवं होतं की फळ खालीच का पडलं? त्याने त्याचे सखोल चिंतन केले.

या चिंतनातून त्याला गुरुत्वाकर्षणाचा क्रांतीकारी शोध लागला. पाडगावकर काय किंवा न्यूटन काय निसर्गाकडे त्यांची आत्मियतेने, तन्मयतेने पाहण्याची दृष्टी, वृत्ती उत्कट होती म्हणूनच ते शोधाचे जनक ठरले. पाडगावकरांना तांबूस पिवळया पिंपळफांदीत नव्या जगाच्या नांदीचा शोध लागला. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.

या कोकणच्या निसर्गात या कोकणच्या गर्भकुशीत आपल्याला अभिनव असं खूप काही सापडेल. एकदा ते दिव्यत्व तुमच्या हाती लागलं की या जगाच्या व्यासपीठावर तुमच्या नावाचा जयजयकार होईल. यशाचं शिखर तुमच्या पायाशी लोटांगण घालील. एका फुलझाडाचं एक फुल हाती घ्या. त्याला निरखून पारखून बघा. त्याला विचारा ‘तुझ्या आत काय दडलंय?’ त्याचा लौकिक त्याला नाही, सांगता येणार. पण ज्या क्षणी तुम्ही फुल हाती घेतलं त्याच क्षणी तुम्हाला कळेल या निसर्गाचा लौकिक तुम्ही मान्य केलेला आहे. कारण हा लौकिक तुमच्याही स्वरुपात लपलेला आहे. त्याला फक्त तुम्ही पुकारा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version