Home टॉप स्टोरी दिल्लीत ६७ टक्के मतदान

दिल्लीत ६७ टक्के मतदान

0

नवी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी ६७.१४ टक्के मतदान झाले.  

नवी दिल्ली – नवी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी ६७.१४ टक्के मतदान झाले. संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. कॉँग्रेसचे नेते अजय माकन, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनीष शिशोदिया, नूपुर शर्मा यांच्यासह ६७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी १० फेब्रुवारीला होणार आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वढेरा, आपचे नेते अरविंद केजरीवाल, केंद्रीयमंत्री हर्षवर्धन, मनेका गांधी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रभूषण कुमार म्हणाले की, संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. उत्तर-पूर्व दिल्लीत ६६.३७ टक्के सर्वाधिक तर दक्षिण दिल्लीत सर्वाधिक कमी ६१.७ टक्के मतदान झाले. मध्य दिल्लीत ६४.६६ टक्के, पूर्व दिल्लीत ६४.६७ टक्के, नवी दिल्लीत ५९.२९ टक्के, उत्तर दिल्लीत ६५.५६ टक्के, उत्तर-पश्चिम दिल्ली ६२.१ टक्के, दक्षिण-पश्चिम दिल्ली ६३.६६ टक्के, पश्चिम दिल्ली ६४.४८ टक्के मतदान झाले.

२०१३ मध्ये दिल्लीत ६६ टक्के मतदान झाले होते तर २००८ मध्ये ५७.५८ टक्के नोंदवले गेले. अवघ्या वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आप, भाजपा आणि कॉँग्रेस या तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

‘आप’ला स्पष्ट बहुमत?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला ५३ जागा मिळून त्याला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्ष विविध एक्झीट पोलनी काढला आहे. ‘इंडिया न्यूज-अ‍ॅक्सीस पोल’च्या पोलमध्ये ‘आप’ला ५३ जागा, भाजपाला १७ जागा, इंडिया टुडे-सिसरो यांच्या एक्झिट पोलने ‘आप’ला ३५ ते ४३ जागा, भाजपाला २३ ते २९ जागा मिळतील, असा निष्कर्ष जाहीर केला. ‘एबीपी नेल्सन’ने ‘आप’ला ३९ जागा तर भाजपाला २८ जागा देऊ केल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने एक्झिट पोलचे निष्कर्ष फेटाळले आहेत.

 नेत्यांचे मतदान

दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज दिल्लीकर मतदानाद्वारे ठरवणार आहेत. उत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघातून सर्वात कमी चार उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यभरात एकूण १२ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ७१४ संवेदनशील मतदान केंद्रे असून त्यामधील १९१ ही अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

दिल्लीतील १.३३ कोटी मतदारांना आज मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये ७३ लाख ८९ हजार ०८९ पुरुष मतदार तर ५९ लाख १९ हजार १२७ महिला मतदार आहेत. यासोबतच ८६२ तृतीयपंथी मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या दोन लाख २७ हजार ३१६ इतकी आहे. तर ३११ मतदार हे १००हून अधिक वयाचे आहेत. दिल्लीतील मातिया महाल मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ४७ हजार २४५ मतदार आहेत. तर चांदनी चौक येथे एक लाख १३ हजार ७७७ मतदार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चहावाला

संपूर्ण मतदाप्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६५ हजार पोलीस कर्मचा-यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने ९५ हजार निवडणूक अधिका-यांना कामाला लावले आहे.

१६ वर्षे दिल्लीतील सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपासमोर यंदाच्या निवडणुकीत आपचे भलेमोठे आव्हान आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध बेदी असे दिल्लीतील निवडणुकीचे चित्र आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version