Home टॉप स्टोरी दिलेल्या आश्वासनांकडे मोदींची पाठ

दिलेल्या आश्वासनांकडे मोदींची पाठ

0

महागाईचा मुद्दा जनतेसमोर प्रभावीपणे मांडून चांगल्या दिवसांची स्वप्ने दाखवणा-या मोदी सरकारने सत्ता मिळताच मात्र दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढल्याचे दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 
मुंबई– महागाईचा मुद्दा जनतेसमोर प्रभावीपणे मांडून चांगल्या दिवसांची स्वप्ने दाखवणा-या मोदी सरकारने सत्ता मिळताच मात्र दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढल्याचे दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. गेल्या महिन्याभरातील केंद्र सरकारचे निर्णय पाहता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये ते अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे, असे त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

चांगले दिवस येणार असे मोदी सत्ता येण्यापूर्वी सांगत होते. देशात सत्ता परिवर्तन झाल्यास महागाई दूर होऊन खरोखरच चांगले दिवस येतील, अशी आशा देशातील जनतेला होती. त्यातूनच त्यांनी मोदींना मतदान केले. मात्र सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या दीड महिन्यातच मोदी सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.

गेल्या दीड महिन्याचा त्यांचा कारभार लक्षात घेतला ‘ शीतावरून भाताची परीक्षा’ या उक्तीनुसार ते पुढे काय करणार ते स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले. याचा विचार राज्यातील जनता नक्कीच करेल आणि त्याचे प्रतिबिंबही आगामी विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सध्या राज्यातील वातावरण दूषित करण्याचे प्रकारही होत असून केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरच या घटना घडू लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुणे, कोल्हापूर सातारा येथे अशा काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या शक्तींना बळ मिळाले आहे, याचा शोध पोलिस यंत्रणेने घ्यावा असेही पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार आणि तटकरेंना चपराक

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय हा केंद्रीय स्तरावरच होईल. राष्ट्रवादीने किती जागा लढवायच्या आणि किती जागा मागायच्या याचा निर्णयही अध्यक्ष म्हणून आपणच घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या १४४ जागांच्या आणि स्वबळावर लढण्याच्या मागणीतील हवा काढली. मतदारसंघातील स्थिती आणि निवडून येण्याची क्षमता हाच निकष जागा वाटपासाठी राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यातून १४४ पेक्षा कमी किंवा जास्तही जागा राष्ट्रवादीला मिळू शकतात, असेही ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version