Home महामुंबई ठाणे दारू अड्डयांवर छापे!

दारू अड्डयांवर छापे!

0

मालवणी येथील विषारी दारूकांडातील मृतांची संख्या १००च्या पुढे गेली आहे.

ठाणे- मालवणी येथील विषारी दारूकांडातील मृतांची संख्या १००च्या पुढे गेली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असताना आता ठाणे पोलीस जागे झाले असून त्यांनी ठाणे व मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा दारूच्या अड्डयांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे पोलिसांनी कासारवडवली व कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. कासारवडवली गावात कमलाकर राऊत हा मद्याचा साठा करून नंतर त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुकानात छापा टाकून ५ हजार १०० रुपयांची दारू जप्त केली.

राऊत याच्याकडे विदेशी मद्याची विक्री करण्याचा परवाना नसताना तो अशी विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कोकणीपाडा येथे मंजुळा शिंदे ही महिला गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तीन लिटर गावठी दारू जप्त केली आहे. याच परिसरात अनुबाई मेघे ही गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या अड्डय़ावरूनही गावठी दारू जप्त केली आहे.

कोकणीपाडा परिसरात गोकुळा धामोडे या महिलेकडूनही गावठी दारू हस्तगत करण्यात आली आहे. चितळसर-मानपाडा येथे प्रमोद घरत यांच्या घरात छापा टाकून गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मीरा रोड येथे २० जणांवर कारवाई

मीरा रोड विभागीय पोलिसांनीही  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने काशीमिरा, नवघर, भाईंदर भागात छापे टाकले आणि गावठी दारूच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी  पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

भिवंडीतही दारू जप्त

भिवंडी पिंपळास येथे झाडींमध्ये बेकायदा गावठी दारू गाळण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत १०० लिटर गावठी दारू जप्त केली. कोनगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version