Home टॉप स्टोरी दाऊद विरोधात रॉ, आयबीने केला राजनचा वापर

दाऊद विरोधात रॉ, आयबीने केला राजनचा वापर

0

राजनच्या नावाआधी अंडरवर्ल्ड डॉन लावले जात असले तरी, त्याचा डॉन म्हणून अंडरवर्ल्डमध्ये असलेला दरारा आता संपला आहे असे जाणकार सांगतात.  
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अटक झाली असली तरी, आता त्याच्याकडून दाऊद इब्राहिमबद्दल नवी माहिती मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र पत्रकार जे.डे.हत्या प्रकरणासह मुंबईत त्याच्या विरोधात दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यांमध्ये महत्वाची माहिती मिळू शकते.

बडा राजनचा अस्त, छोटा राजनचा उदय 

राजनच्या नावाआधी अंडरवर्ल्ड डॉन लावले जात असले तरी, त्याचा डॉन म्हणून अंडरवर्ल्डमध्ये असलेला दरारा आता संपला आहे असे जाणकार सांगतात. राजनचे अनेक विश्वासू सहकारी त्याला सोडून गेले. ते स्वतंत्रपणे त्यांच्या टोळया चालवत आहेत. दाऊदपासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी राजनला एका देशातून दुस-या देशात जाऊन विजनवासातले जीणे जगावत लागत होते.

त्याने त्याचा वावर खूपच मर्यादीत केला होता. आपल्या वास्तव्याचे ठिकाण लपवण्यासाठी तो फक्त व्हीओआयपीवर कॉल करायचा. राजनच्या अटकेनंतर विविध तर्क-विर्तक लावले जात आहेत.

राजनची प्रकृती खालावली आहे. त्यात छोटा शकील त्याच्या मागावर आहे. अशा परिस्थितीत एका देशातून-दुस-या देशात पळत रहाण्यापेक्षा तुरुंगच अधिक सुरक्षित असल्याने राजन स्वत:हूनच तपास यंत्रणांना शरण आला असावा असा गुन्हेगारी जगताच्या अभ्यासकांचे मत आहे.

राजनच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणा-या सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबर २०१४ मध्ये राजनच्या टोळीमध्ये एकही सदस्य नव्हता. तात्पुरत्या कामासाठी माणसे मिळावीत म्हणून तो उत्तरप्रदेश आणि अन्य काही राज्यांतील व्यक्तींच्या संपर्कात होता. डॉन म्हणून शक्ती क्षीण झाल्यामुळेच राजनने गुप्तचर यंत्रणांमधील आपले जुने संबंध वापरुन स्वत:ची अटक घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजन आता ५६ वर्षांचा आहे. दाऊदपासून त्याने ९३-९४ साली फारकत घेतली तेव्हा त्याचे उपद्रव मूल्य होते. त्यावेळी भारतीय गुप्तचरयंत्रणांनाही त्याच्याकडून दाऊदच्या नेटवर्कची सविस्तर माहिती मिळाली.

दाऊद विरोधात आक्रमक मोहिम उघडून त्यानेही अप्रत्यक्षपणे तपासयंत्रणांना मदत केली. १९९८ साली बनावट पासपोर्टवर प्रवास करत असल्याच्या आरोपाखाली थायलंडमध्ये त्याला अटक झाली होती. त्यावेळी एकदिवसात तो सुटला होता. त्यावेळी भारतीय तपास यंत्रणा त्याच्या हस्तांतरणासाठी फारशा उत्सुक्त नव्हत्या.

राजनला दाऊदपासून वेगळे होऊन आता २३ वर्ष झाली आहेत. दरम्यानच्या काळात गुन्हेगारी विश्वही मोठया प्रमाणात बदलले आहे. ९२-९३ साली राजनकडे दाऊदच्या नेटवर्कची जेवढी माहिती होती. तेवढी माहिती निश्चित आता त्याच्याकडे नसेल. त्यामुळे आता दाऊद विरोधात राजन कितपत उपयोगी पडेल याबद्दल शंकाच आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version