Home कोलाज दाऊदच्या मुसक्या कधी?

दाऊदच्या मुसक्या कधी?

0

सुमारे २५ वर्ष सर्वच सरकारांच्या तोंडाला पानं पुसणा-या  दाऊद इब्राहिमला स्वत:लाच भारतात येण्याची इच्छा असल्याचं सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली. अनेक गुन्हेगारी आणि देशविघातक कारवायांमुळे दाऊदच्या अटकेकडे सर्वाचं लक्ष असणं साहजिक आहे. परंतु, अद्याप त्याच्या अटकेला यश आलं नसल्याने इक्बालच्या कसून तपासणीतून काही धागेदोरे हाती लागले तर ते मोठं यश ठरेल, हे नक्की!

कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम या ना त्या कारणानं चच्रेत राहत आला आहे. आजवर बरेच प्रयत्न करूनही दाऊद इब्राहिमचा नेमका ठावठिकाणा शोधणं शक्य झालेलं नाही. तो पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं जातं. परंतु, त्याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी म्हणून दाऊद इब्राहिमला भारतात आणणं गरजेचं आहे. त्यासाठी भारतानं दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत काही देशांना विचारणा केली आणि त्याला पकडून भारताच्या ताब्यात द्यावं, अशीही विनंती केली. परंतु अजूनही दाऊद भारताच्या हाती लागलेला नाही. अशा परिस्थितीत ‘दाऊद इब्राहिम भारतात परतण्याच्या प्रयत्नात असून या संदर्भात तो केंद्र सरकारशी बोलणी करत आहे. दाऊदला भारतात परत आणण्याचं श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे’ असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. ‘दाऊद अत्यंत आजारी असून त्याला भारतात परत येऊन मुंबईत अखेरचा श्वास घेण्याची इच्छा आहे.

केंद्र सरकार त्याच्या इच्छेनुसार त्याला परत आणेल आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी या प्रकरणाचा लाभ घेईल. शेतकरी आत्महत्या करून आपली आयुष्यं संपवत असताना पंतप्रधान दाऊदच्या जीवावर आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत’ असाही आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावरून दाऊद प्रकरणाचं राजकीय भांडवल केलं जाण्याचा मुद्दाही चच्रेत आला. या पार्श्वभूमीवर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेण्यात तपास यंत्रणेला नुकतंच यश आलं. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या घरातून इक्बालला ताब्यात घेण्यात आलं. आता दाऊदच्या कारवाया तसंच त्याच्या ठावठिकाण्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याच्या दृष्टीने इक्बालची अटक अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

इक्बाल हा दाऊदचा मुंबईत असलेला एकमेव भाऊ आहे. ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या दोघा सहाय्यकांना १८ सप्टेंबरला अटक केली. काही स्थानिक राजकारण्यांशी संगनमताने त्याच्या तिथे कारवाया सुरू होत्या, असं सांगितलं जात आहे. आपला फोन टॅप केला जाईल या भीतीपोटी दाऊद त्याच्याशी आणि मुंबईतील आपल्या इतर नातेवाइकांशी किंवा एजंटांशी गेली तीन वष्रे बोलला नसल्याचं इक्बालने पोलिसांना सांगितलं आहे. इक्बालने दिलेल्या माहितीनुसार सध्या कराचीत दाऊदची चार घरं असून पाकिस्तानात इतरत्रही त्याची काही निवासस्थानं आहेत. मोठा भाऊ अनीस याने इक्बालला आंतरराष्ट्रीय नंबर्सवरून फोन केले आहेत. इक्बालची सर्व वक्तव्यं तपासली जात असून त्यानुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना दाऊदविषयीची माहिती पुरवली जात आहे.

दाऊदचं गुन्हेगारी साम्राज्य चालवण्यासाठी अनिस इब्राहिम या आपल्या मोठय़ा भावाच्या संपर्कात इक्बाल असल्याचंही स्पष्ट झालं आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात अनिस सामील होता. इक्बालने दिलेल्या माहितीनुसार, अनिसने त्याला एकदा ईदच्या वेळी आणि आणखी एकदा असे दोनदा आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन केले होते. परंतु प्रत्यक्षात ते अनेकदा एकमेकांशी बोलल्याचं स्पष्ट झालं आहे. इक्बालने डेव्हलपर्स आणि सराफी व्यावसायिक यांच्याकडून गेल्या तीन वर्षामध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आणि ती डी-कंपनीला पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. परंतु त्याने हा आरोप फेटाळला असून, आपण डेव्हलपर्सबरोबर व्यवसाय करत असल्याचं सांगितलं आहे. दाऊदचा निकटवर्ती असलेल्या छोटा शकीलशी आपलं पटत नसल्याचं इक्बालनं स्पष्टपणे सांगितलं असून आपण त्याचा तिरस्कार करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सध्या दाऊदशी चांगले संबंध असलेल्यांची नावं काढून घेण्याचे प्रयत्न तपास अधिकारी करत असून चित्रपट उद्योगातील काहीजणांचा त्यात समावेश असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

दाऊदच्या नावावर इक्बालने सुरू केलेल्या खंडणी उकळण्याच्या गुंडगिरीचा आपल्याला त्रास झाल्याचं सांगणा-या  अनेक व्यक्ती आता ठाण्यात पुढे येऊ लागल्या आहेत. या तपासणीतून किमान बारा लोकांची नावं उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी व्यक्त करत आहेत. या संदर्भात एका बिल्डरने आणि सराफी व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. याविषयीच्या पुढील तपासासाठी पोलिसांची टीम बिहारला गेली आहे. इथल्या लोकांना घाबरवून खंडणी उकळण्यासाठी बिहारमधून शूटर्सना आणलं जातं, असंही समोर आलं आहे. इक्बाल कासकरला याआधी २०१५ मध्ये खंडणीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. संयुक्त अरब अमिरातींमधून २००३  मध्ये हद्दपार करण्यात आलं, तेव्हापासून तो भारतात आहे.

मूळचा कोकणातील असलेला दाऊद एका पोलीस हवालदाराचा मुलगा असला तरी सुरुवातीपासूनच बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतला होता. भुरटय़ा चो-यांपासून सुरुवात करून त्याने गुन्हेगारी जगतात थैमान घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात तो सोन्याच्या तस्करीकडे वळला आणि नंतर बेहिशेबी मालमत्तेच्या जोरावर काळ्या धंद्यांचं साम्राज्य उभं केलं. २०१५ मध्ये फोब्र्जने केलेल्या मोजदादीनुसार दाऊदची एकूण संपत्ती जवळजवळ ६.७ अब्ज डॉलर्सची आहे. तस्करी आणि इतर गुन्ह्यांसोबतच आता तो भारताच्या शत्रूंना मदत करत असून भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला आहे. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याने भारतातून पलायन केलं आणि तेव्हापासूनच तो पाकिस्तानमध्ये आश्रयाला असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे. भारतविरोधी दहशतवादी कारवायांमधील सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोठं प्रकरण म्हणून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाकडे पाहिलं जातं. या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. अल्कायदाशी असलेल्या संबंधांमुळे २००३ मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. इंग्लंडनं अलीकडेच त्याची मिडलँडमधील मालमत्ता आणि वॉरविकशायरमधील हॉटेल गोठवलं आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने २०१५च्या ऑगस्टमध्ये दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावावरचं फोन बिल मिळवलं होतं. या बिलावर डी-१३, ब्लॉक – ४, केडीए, एससीएच-५, क्लिफ्टन, कराची असा पत्ता होता. संबंधित वृत्तपत्राच्या जाळ्याद्वारे फोन केल्यानंतर तिने फोनही उचलला होता आणि आपण कराचीत असल्याचं सांगितलं होतं. तसेच दाऊद त्यावेळी झोपला असल्याचं उत्तरही तिने दिलं होतं. मात्र ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक वेळी तिने त्या नंबरवर संबंधितांनी केलेल्या फोनला ‘राँग नंबर’ असं उत्तर दिलं होतं. अलीकडेच एका टीव्ही वाहिनीने दाऊदच्या सहाय्यकाशी फोनवरून संपर्क साधला होता आणि त्याने प्रेक्षकांसमोर दाऊद आणि तो स्वत: बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले नसल्याचा दावा केला होता. दाऊदला मूत्रिपडाचा आजार असल्याचं सांगितलं जात असून काहींनी तो यकृताच्या आजाराने बेजार झाल्याचं म्हटलं आहे.

सध्या तो मरणासन्न परिस्थितीत असल्याची बातमीही काही वृत्तवाहिन्यांनी जाहीर केली होती. मात्र सुमारे २५ र्वष सर्वच सरकारांच्या तोंडाला पानं पुसणा-या  दाऊदला स्वत:लाच आता भारतात येण्याची इच्छा असल्याचं सांगून मनसेच्या राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली. अनेक गुन्हेगारी आणि देशविघातक कारवायांमुळे दाऊदच्या अटकेकडे सर्वाचं लक्ष असणं साहजिक आहे; परंतु अद्याप तरी त्याच्या अटकेला यश आलं नसल्याने इक्बालची कसून तपासणी सुरू असून त्यामधून काही धागेदोरे हाती लागले तर ते मोठं यश ठरेल, हे नक्की. त्यादृष्टीने तपास यंत्रणांची कसोटी लागणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version