Home महामुंबई दाऊदचे मोदींशी साटेलोटे

दाऊदचे मोदींशी साटेलोटे

0

कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला याला भारतात यायचे आहे.

मुंबई- कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला याला भारतात यायचे आहे. परंतु त्याचे श्रेय मात्र भाजप आणि नरेंद्र मोदी घेणार. आम्ही दाऊदला भारतात आणले, जे काँग्रेसला जमले नाही ते आम्ही करून दाखवले असे भासवून भाजप पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, असा धक्कादायक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला गुजरातशी जोडण्याचा डाव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत फेसबुक पेज सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन रवींद्र नाटय़ मंदिर येथे झाले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावेत, असे मी एका प्रेमापोटी, आदरापोटी बोललो होतो. पण, मुंबई-महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात, तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालू, आधी काय बाललो होते ते तेल लावत गेले, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकरी मरताहेत त्याची चाड नाही, पण गुजरात-मुंबई प्रवास दोन तासांत पूर्ण करण्यासाठी १ लाख १० हजार कोटींचे कर्ज काढले जात आहे. कुणासाठी चाललेत हे उद्योग? मुंबई गुजरातला जोडायचे जे जुने स्वप्न आहे, त्याच्यासाठी हे सुरू आहे. पण मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहणार, असेही त्यांनी ठणकावले. साडेतीन वर्षांत नोटेचा रंग सोडला तर काय बदलले? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मी होतो. देशाची प्रगती होईल असा विश्वास मीही बाळगला होता. पण साडेतीन वर्षांत नुसते इव्हेंट्सच सुरू आहेत, असा टोला लगावून राज ठाकरे पुढे म्हणाले की, ७० वर्षे हा देश फक्त भाषणेच ऐकत आला आहे. नुसत्या खोटय़ा प्रचाराला काय अर्थ आहे? मेक इन इंडियाबद्दल आता कुणीच बोलत नाही. नोटाबंदीनंतर ९९ टक्के नोटा परत आल्या. मग काळा पैसा गेला कुठे? काळा पैसावाले अजूनही आहेत तिथेच आहेत.

परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार होते. ते कुठे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. आपल्या फेसबूक सुरू करण्यामागील भूमिका सांगताना ते म्हणाले की, विरोधासाठी फेसबुक पेज नाही. सत्ताधा-यांकडून चांगली गोष्ट घडली, तर अभिनंदन करेन. पण, चुकीची गोष्ट घडली तर चाबूक काढायलाही मागेपुढे पाहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ३० हजार विहिरी खोदल्या. मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डेही विहिरी म्हणून मोजता की काय? असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version