Home एक्सक्लूसीव्ह दरड दुर्घटनेत बळी गेल्यास नागरिकच जबाबदार

दरड दुर्घटनेत बळी गेल्यास नागरिकच जबाबदार

0

पालिकेने नोटिस बजावल्यानंतर दुस-या ठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार देणा-या रहिवाशांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्यांचीच जबाबदारी राहील, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई- माळीण दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक दरडींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिकेने नोटिस बजावल्यानंतर दुस-या ठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार देणा-या रहिवाशांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्यांचीच जबाबदारी राहील, असे विधान मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी ‘प्रहार’शी बोलताना केले. प्रशासनाने आपले हात वर केल्याने रहिवाशांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिका-यांच्या अखत्यारित मुंबईतील धोकादायक दरडी येतात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील धोकादायक दरडींचे सव्‍‌र्हे करण्यात येतो. साकीनाका येथे २००५ मध्ये दरड कोसळल्यानंतर ७३ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही अनेकदा दरडीच्या धोकादायक छायेखाली राहणा-या रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र पावसाळा जवळ आला की, रहिवासीही जागे होतात आणि जीवन धोक्यात असल्याची आेरड करतात. मात्र ते महापालिकेने स्थलांतरित होण्याची नोटिस बजावल्यास दुसरीकडे राहायला जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे उघड झाले आहे.

दरड अथवा टेकडीवर राहणा-यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे हा पर्याय नाही. शासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात. मात्र अनेक वेळा रहिवासीच स्थलांतर करण्यास टाळाटाळ करतात आणि जीव गमावतात. टेकडीवर राहणा-या रहिवाशांना स्वत:च्या जिवाची काळजी घेणे गरजेचे आहे. महापालिका नोटिस बजावूनही स्थलांतरित होण्यास टाळाटाळ करत असतील, तर दुर्घटनेस रहिवासीच जबाबदार आहेत, अशी स्पष्टोक्ती कुंटे यांनी दिली आहे.

यंदाही धोकादायक दरडींचे सर्वेक्षण झाले असून, संबंधित रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते. मात्र रहिवाशांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. टेकडी आणि दरडीखाली राहणा-या रहिवाशांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी  योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. येत्या आठवडय़ात म्हाडा, जिल्हाधिकारी, ग्रेटर मुंबई आपत्कालीन विभागाचे आयुक्त आणि प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीत धोकादायक दरडीखाली रहिवाशांच्या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच पुढील वर्षी धोकादायक दरडीखाली रहिवासी नसतील, असा प्रयत्न करण्यात येईल, असेही कुंटे म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version