Home टॉप स्टोरी दरडींनी केला घात

दरडींनी केला घात

0

राज्यात मुसळधार पावसाचे तुफान सुरू असतानाच नेरळ, दाभोळ आणि मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर दरडी कोसळल्याने मोठा घात झाला.

मुंबई- राज्यात मुसळधार पावसाचे तुफान सुरू असतानाच नेरळ, दाभोळ आणि मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर दरडी कोसळल्याने मोठा घात झाला. माळीण येथील दुर्घटनेची आठवण करून देणा-या या घटनांपैकी नेरळमध्ये एका घरावर दरड कोसळून पाचजणांचा बळी गेला तर दाभोळमध्ये तीन घरे गाडली गेली. त्यात एकाचा बळी गेला असून चौघांचा शोध सुरू आहे. तर मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर खंडाळयाजवळ दरड कोसळून वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती.

नेरळ दुर्घटनेत ५ जण ठार

नेरळ- गेले दोन दिवस सुरूअसलेल्या संततधार पावसाने भिंत कोसळून नेरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे बळी घेतले आहेत. नेरळच्या मोहाचीवाडी भागात संरक्षक भिंत कोसळून दिघे कुटुंब ढिगा-याखाली गाडले जावून हा अपघात घडला. मोहाचीवाडी भागात किसन राघो दिघे यांचे घर माथेरान डोंगरातील पाणी वाहून नेणा-या नाल्याच्या कडेला आहे. त्यांच्या घराच्या वरच्या भागात त्यांच्याच नातेवाईकांचे घर आहे. त्या घराला त्यांनी नाल्याच्या कडेला दगडी संरक्षण भिंत बांधली. ती भिंत रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दिघे यांच्या घरावर कोसळली. त्यावेळी झोपेत असलेले किसन दिघे आणि अन्य चार जण दगडी भिंतीच्या खाली दबून गेले. अर्चना किसन दिघे (१९), स्वप्नेष किसन दिघे जाईबाई मारुती कदम (७२), सुनंदा किसन दिघे (४१), किसन राघो दिघे (४९) अशी मृतांची नावे आहेत.

नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुरेश लाड यांनी घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे हे सर्व सरकारी मदत कार्यावर लक्ष ठेवून होते.

दाभोळमध्ये तीन घरे दरडीखाली

दाभोळ- दाभोळच्या टेमकर वाडीवर सोमवारी सकाळी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महाडीक व मांजरेकर कुटुंबीयांच्या घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत तीन घरे दरडीखाली गाडली गेली. यात एकाचा मृत्यू झाला असून चौघांचा शोध सुरू आहे. तसेच दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेसीबी, ग्रामस्थ, आपत्कालीन यंत्रणा, दापोलीतील आपत्कालीन पथक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पाचपैकी केवळ एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

दाभोळ टेमकरवाडी लगतच्या महाडिक व मांजरेकर यांच्या घरावर पहाटे ३.३० च्या दरम्यान दरड कोसळली. यात तीन घरे गाडली. त्यातील कमलाकर सहदेव महाडीक (६२), कमलाक्षीनी कमलाकर महाडीक (५९), दिनकर सहदेव महाडीक (५३), मधुकर गोपीनाथ महाडीक (६५) , मधुमालती मधुकर महाडीक (६०) हे गाडले गेले आहेत.

तर सिद्धी हरिश्चंद्र हरेकर, हरिश्चंद्र शंकर हरेकर, हर्षला हरिश्चंद्र हेरेकर, सिद्धी हरिश्चंद्र हरेकर  हे जखमी झाले आहेत. हरेकर यांच्या घरावरही दरड कोसळली. यात सिद्धी व तिची आई हर्षदा या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घरात बारा ते तेरा माणसे होती. मात्र ती सर्व सुखरूप आहेत.

या दुर्घटनेनंतर टेमकरवाडी येथील १५ कुटुंबियांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत कुटुबियांना दाभोळमधील काही कुटुंबीयांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सोमवारी सकाळी आठ वा.पर्यंत एकुण तब्बल २१५ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे तर दापोलीत एका दिवसात १४२ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकुण सुमारे ९९६ मि.मि. पाऊस केवळ आठवडयाभरात झाला आहे. तालुक्यातील सरासरीच्या अंदाजे एकुण तब्बल २५ टक्के पाऊस आतापर्यंत झाले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरही दरड

पुणे- खंडाळा बोगद्याजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकवीरा देवीच्या कार्ला गडावरही रविवारी मध्यरात्री दरड कोसळून विश्वस्त मंडळाचे कार्यालय व दर्शन बारींचे नुकसान झाले.

खंडाळा घाटात दरड पुण्याच्या दिशेने जाणा-या वाहनावर पडल्याने पद्म जैन व नरेंद्र जैन हे दोघेजण जखमी झाले. मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवण्यात आली. त्यामुळे लोणावळा भागातही मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version