Home क्रीडा थँक यू, विश्वनाथन आनंद!

थँक यू, विश्वनाथन आनंद!

0

नवीन जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध विश्वनाथन आनंदनं दहावा डाव बरोबरीत सोडवला, त्यावेळी किमान दोन वेळा कार्लसननं तो जिंकण्याची संधी दवडली होती.

नवीन जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध विश्वनाथन आनंदनं दहावा डाव बरोबरीत सोडवला, त्यावेळी किमान दोन वेळा कार्लसननं तो जिंकण्याची संधी दवडली होती. अन्यथा संपूर्ण लढतीची स्कोअरलाइन ७-३ अशी अधिकच एकतर्फी दिसली असती. सुरुवातीचे चार डाव सोडल्यास कार्लसननं या लढतीवर वर्चस्व गाजवलं.

त्याचबरोबर, सुरुवातीचे चार डाव वगळता बाकीच्या डावांमध्ये तयारी, एकाग्रता, हिंमत, डावपेच या सर्वच आघाडय़ांवर आनंदकडून गंभीर त्रुटी दिसून आल्या. वास्तविक या वर्षभरात आनंद थोडा अधिक बिनधास्त खेळत होता. मात्र, त्याच्या डावात वारंवार उद्भवणा-या चुकांविषयी त्याला अखेपर्यंत काहीही करता आलं नाही.

कार्लसनविरुद्धची लढत सुरू होण्यापूर्वी आनंदनं विविध स्पर्धामध्ये १४ डाव जिंकले, मात्र त्याचबरोबर तब्बल ९ डाव गमावले. यात कार्लसनविरुद्ध ताल मेमोरियल स्पर्धेत झालेल्या एकतर्फी पराभवाचाही समावेश आहे. वरकरणी आनंदच्या चाहत्यांना या घडामोडी म्हणजे त्याच्या डावपेचांमध्ये मुद्दाम घडवून आणलेला फरक वाटला.

मी जिंकेन काही, हरेन काही असा हा अ‍ॅप्रोच. त्याच न्यायानं कार्लसनविरुद्ध जगज्जेतेपदाच्या लढतीत तो ढीगभर डाव हरेल, तरी काही डाव जिंकेलही असं अगदी अखेपर्यंत वाटत राहिलं. पण कार्लसनविरुद्ध आनंदला अखेपर्यंत स्ट्रॅटेजीच निश्चित करता आली नाही. हा दोष आनंदइतकाच त्याच्या टीमचाही आहे.

गेल्या पाच वर्षात प्रथमच आनंदला सहायकांची नवी टीम उभी करावी लागली, हा आणखी एक घटक निकालावर परिणाम करणारा ठरला. क्रॅमनिक, टोपालोव आणि गेलफँडविरुद्ध आनंदकडे पीटर हायने नील्सन, रुस्तम कासिमझानॉव, सूर्यशेखर गांगुली आणि राडोस्लाव वोयतासेक अशी टीम होती. कार्लसनविरुद्ध या टीममधील वोयतासेक हा एकमेव बुद्धिबळपटू कायम राहिला. बाकीचे तिघे म्हणजे कृष्णन शशीकिरण, संदीपन चंदा आणि पीटर लेको यांचे परस्परांशी किंवा आनंदशी टय़ुनिंग जुळायला वेळ नक्कीच लागला असणार. इतकी र्वष आनंदबरोबर असलेली त्याची टीम अचानक बदलावी लागली, ही आनंदच्या दृष्टीनं मोठीच अडचण ठरली.

इथं एक नमूद केलं पाहिजे, की कार्लसनचा खेळ आकर्षक वगैरे अजिबात नव्हता आणि नसतो. चांगली ओपनिंग खेळण्याकडे त्याचा कल नसतो. त्यामुळेच त्याचे डाव बुद्धिबळातील सौंदर्यशास्त्राच्या निकषांवर फारच सपक वाटतात. मात्र त्याच्याकडे एकंदरीतच बुद्धिबळातील बारकाव्यांविषयी समज जबरदस्त आहे. तो कधीही थकत नाही.

कोणत्याही चांगल्यातल्या चांगल्या ओपनिंगसमोर बावचळत नाही. चटकन बरोबरी तर अजिबात स्वीकारत नाही. पुढच्या अनेक चालींचा विचार तो बराच वेळ करतो. त्यामुळे अमक्या एखाद्या चालीसमोर तो गोंधळलाय असं समोरच्याला किंवा इतरांना वाटतं. तिथंच फसगत होते. एकदा का त्याच्यासमोर पुढील चालींचा सिक्वेन्स पक्का झाला, की मग पटावर तो धडाधड चाली करतो. इथं प्रतिस्पर्धी गोंधळू लागतो.

कार्लसनचं आणखी एक बलस्थान म्हणजे तो थकत नाही किंवा कंटाळत नाही. अगदी शेवटपर्यंत चिवटपणे खेळतो. उच्चस्तरीय बुद्धिबळात एक वेळ अशी येते ज्यावेळी एखाद्या बुद्धिबळपटूला डाव संपवावासा वाटू लागतो. एकतर डावात काही जान उरलेली नसते किंवा त्या बुद्धिबळपटूकडे ऊर्जा शिल्लक नसते. कार्लसन अत्यंत फिट बुद्धिबळपटू आहे आणि ब-याचदा स्पर्धेदरम्यानही विश्रांतीच्या दिवशी फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळताना दिसतो. पोझिशनल खेळून हळूहळू मोर्चेबांधणी करण्याला तो प्राधान्य देतो.

त्यामुळे त्याचा खेळ काहीसा कंटाळवाणा भासतो, पण वास्तविक कोणतीही त्रुटी न ठेवता तो खेळत राहतो.आनंदला त्याचा मूळचा आक्रमक आणि टॅक्टिकल खेळ दाखवता आला नाही आणि त्याच्या शैलीशी पूर्णपणे विसंगत अ‍ॅप्रोच ठेवल्यामुळे तो हरला. पण तरीही गेली २५ वर्ष त्यानं बुद्धिबळ जगतात ज्या प्रकारे वर्चस्व गाजवलं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलं त्याला तोड नाही. सचिन तेंडुलकरप्रमाणेच आनंदही भारतीय क्रीडाक्षेत्रातलं अस्सल रत्न आहे. आनंद युग संपलेले नाही. लवकरच तो ताज्या दमानं आणि नव्या उमेदीनं, त्याचबरोबर जगज्जेतेपदाचं कोणतंही दडपण न बाळगता खेळू लागेल. तोपर्यंत त्याला धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य आहे.
थँक यू आनंद!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version