Home Uncategorized तळागाळात पोहोचल्याशिवाय इंटरनेट क्रांती अशक्य

तळागाळात पोहोचल्याशिवाय इंटरनेट क्रांती अशक्य

0

इंटरनेट विस्तारातील प्रमुख अडथळा हा महागडी सेवा असून तो दूर होणे आवश्यक आहे. या कामात फेसबुकचे मोठे योगदान राहील, असे अश्वासन फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी दिले.

नवी दिल्ली – इंटरनेट हे श्रीमंत आणि शक्तिशाली वर्गासाठी मर्यादित राहता कामा नये. ही सुविधा समाजाच्या तळागाळात पोहोचली तरच ख-या अर्थाने इंटरनेट क्रांती झाली असे म्हणता येईल. इंटरनेट विस्तारातील प्रमुख अडथळा हा महागडी सेवा असून तो दूर होणे आवश्यक आहे. या कामात फेसबुकचे मोठे योगदान राहील, असे अश्वासन फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी दिले.

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यानंतर कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेल्या फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग भारत दौ-यावर आल्याने देशाचे जागतिक तंत्रज्ञान बाजारपेठेतील वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. झुकरबर्ग यांची ही देशात येण्याची पहिलीच वेळ आहे. विविधतेने नटलेल्या भारतामध्ये फेसबुकच्या वाढीसाठी अमर्यादित संधी आहेत. मोठया महत्त्वाकांक्षा असलेला हा देश असून येथे फेसबुक समर्पण भावनेने काम करेल, असा शब्द त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेणार असल्याचे सांगतानाच गावागावात इंटरनेट पोहोचवण्याच्या त्यांच्या उद्दिष्टामध्ये आपण काही मदत करू शकू का, याची चाचपणी या भेटीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेत ९११ आणि भारतात १०० क्रमांक डायल करताच फ्री बेसिक इंटरनेट सेवा मिळणे आवश्यक असल्याचे झुकरबर्ग म्हणाले. इंटरनेट.ऑर्गच्या माध्यमातून जगभरात स्वस्त इंटरनेट सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पाचे संस्थापक सदस्य असलेल्या फेसबुक, इरिक्सन, मेडियाटेक, नोकिया, ओपेरा, क्वॉलकॉम आणि सॅमसंग यांनी वंचित पाच अब्ज लोकांना इंटरनेटशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तंत्रज्ञानाचा संपूर्ण समाजाला फायदा झाला पाहिजे. श्रीमंत आणि शक्तिशाली वर्गाची ती मक्तेदारी असता कामा नये. हे जेव्हा होईल तेव्हाच ख-या अर्थाने तंत्रज्ञान क्रांती झाली असे म्हणू शकू. नवनिर्मिती आणि नव्या संकल्पनांची जगभरात लयलूट सुरू आहे, मात्र ऑनलाइन नसलेले भारतीय यापासून वंचित राहत आहेत, असे ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप मोफतच!

व्हॉट्सअ‍ॅप ही मेसेजिंग सेवा १९ अब्ज डॉलरला खरेदी करणा-या फेसबुकने ती नजीकच्या काळात सशुल्क करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीकडून ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले. ६० कोटींपेक्षा जास्त लोकांकडून महिन्याला या अ‍ॅपचा वापर केला जातो. जाहिरातीचा महसूल नसतानाही विविध प्रकारच्या फोनवर ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी वार्षिक ९९ सेंट सदस्य शुल्क आकारले जात असून पहिल्या वर्षासाठी हे शुल्क माफ करण्यात आले आहे.

स्थानिक भाषेतील अ‍ॅप्ससाठी १० लाख डॉलर

तंत्रज्ञान जगतातील तरुण अब्जाधीशांपैकी एक असलेल्या झुकरबर्ग यांनी शेतकरी, स्थलांतरित आणि महिला यांच्यासाठी अ‍ॅप्स विकसित करणा-या इंजिनीअर्सना मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी १० लाख डॉलरचा (सुमारे ६ कोटी रुपये) निधी फेसबुककडून उभारला जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे स्थानिक भाषेमध्ये नवे अ‍ॅप्स आणि सेवा दाखल करण्याची स्पर्धा लागेल असा विश्वास व्यक्त करताना २००७पासून स्थानिक भाषेतील अ‍ॅप्स विकसित करण्यासाठी फेसबुकचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेत फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ६५ टक्के आहे. यामध्ये १० भारतीय भाषांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

शिक्षणाच्या प्रसारासाठी हवी सरकारला मदत

सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुककडून सरकारला शैक्षणिक आणि मुलींचे सक्षमीकरण, स्त्री-भ्रूणहत्या आणि स्वच्छ गंगा अभियान यामध्ये मदतीचा हात हवा असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. मार्क झुकरबर्ग यांची पंतप्रधान आणि दूरसंपर्कमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबर बैठक होणार असून या वेळी चर्चेचे हे प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version