Home एक्सक्लूसीव्ह ..तर शिवडी जेट्टीवर परदेशी पाहुण्यांची अखेरची वारी!

..तर शिवडी जेट्टीवर परदेशी पाहुण्यांची अखेरची वारी!

0

निळे आकाश, दूरवर पसरलेली हिरवळ आणि शिवडी जेट्टीवर मोठय़ा संख्येने जमलेले फ्लेमिंगो, अधूनमधून उडणारे बगळे असे विहंगम दृश्य टिपण्याचे यंदाचे वर्ष अखेरचे वर्ष ठरू शकते. 

मुंबई – निळे आकाश, दूरवर पसरलेली हिरवळ आणि शिवडी जेट्टीवर मोठय़ा संख्येने जमलेले फ्लेमिंगो, अधूनमधून उडणारे बगळे असे विहंगम दृश्य टिपण्याचे यंदाचे वर्ष अखेरचे वर्ष ठरू शकते.

हिवाळय़ात स्थलांतरित होऊन मुंबईत येणा-या व उन्हाळा संपेपर्यंत वास्तव्यास असणा-या पाहुण्यांना बघण्यासाठी निसर्गप्रेमी आणि आबालवृद्धांची शनिवारी रिघ लागली होती. आता हे दृश्य पुन्हा टिपता येईल की नाही अशी चिंताही नागरिकांसह फ्लेमिंगो फेस्टिव्हलचे प्रमुख आयोजक असलेल्या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) अधिका-यांत होती.

एमएमआरडीएतर्फे शिवडी-नाव्हा-शेवा समुद्रीमार्गे जाणा-या ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’चे (एमटीएलएल) काम वर्षाअखेरीस सुरू होणार आहे. हे काम सुरू झाल्यावर बांधकाम यंत्रसामग्रीची ने-आण, ध्वनी-वायू प्रदूषण होऊन शिवडी जेट्टीवर फ्लेमिंगो फिरकण्याची शक्यता कमी असल्याची भीती ‘बीएनएचएस’चे शिक्षण व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक संचालक अतुल साठे यांनी व्यक्त केली.

शनिवारी ‘बीएनएचएस’तर्फे ‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. शेकडो फ्लेमिंगोंच्या हालचाली टिपण्यासाठी लहान-थोरांनी शिवडी जेट्टी परिसरात दुपारपासून गर्दी केली होती. दुर्बीण, कॅमेरा घेऊन प्रत्येक जण पाहुण्यांचे मोहक दृश्य टिपत होते. ‘बीएनएचएस’चे पक्षीतज्ज्ञ, स्वयंसेवी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जण पक्ष्यांविषयी माहिती जाणून घेत होते. पक्ष्यांच्या माहितीबाबत भरवलेले प्रदर्शन, विविध स्पर्धा बगळय़ांचे चित्र रंगवणे, प्रश्नमंजुषा असे निसर्ग शिक्षण उपक्रम सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. अन्नाच्या शोधात फिरणा-या आणि मध्येच घोळक्याने उड्डाण भरणा-या फ्लेमिंगोच्या लयबद्ध हालचाली मुंबईकरांना मोहून टाकत होत्या.

दुर्मीळ पक्ष्यांचे महत्त्व, निसर्गाशी असेले त्यांचे नाते उलगडणे आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचवणे या उद्देशाने फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. ‘एमटीएचएल’ प्रकल्पाच्या घोषणेनंतर पक्षीप्रेमींद्वारे शिवडी येथे स्थलांतरित होणा-या पक्ष्यांबाबत चिंता व्यक्त होत होती.

 पाहुणे जाणार कुठे?

‘एमटीएचएल’चे बांधकाम सुरू झाल्यावर त्याचा परिणाम शिवडी जेट्टीवर येणा-या फ्लेमिगोंच्या संख्येवर होणार आहे. हे पक्षी स्थलांतरित होऊन कोणत्या भागाकडे जातील, यावर अतुल साठे म्हणाले की, ‘शिवडी जेट्टी परिसरात चिखलाणीचा भाग जेवढा विस्तारला आहे तेवढा इतर कुठेच नाही. ‘एमटीएचएल’चे काम सुरू झाल्यामुळे येथे असुरक्षित वाटल्यास पक्षी नवी मुंबईच्या दिशेने स्थलांतरित होऊ शकतात. कदाचित ते होणारही नाहीत. ते अन्नाच्या शोधात मुंबईबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version