Home महामुंबई तरुणांनो, मी तुमच्या पाठीशी आहे : शरद पवार

तरुणांनो, मी तुमच्या पाठीशी आहे : शरद पवार

0

सरकारविरोधी लिखाणावरून नोटीस बजावलेल्यांशी साधला संवाद

मुंबई – एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा प्रश्न शनिवारी देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणा-या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी दिले.

काही दिवसांपूवी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरून ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात जी व्यक्ती सध्या ओएसडी म्हणून कार्यरत आहे, ती व्यक्ती अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात काय चालते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.

सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्रभरातून येऊन मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसत नाहीत. पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार व सेक्युलरिझम या गोष्टींबाबत त्यांची भूमिका आग्रही आहे. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर आपली मते ते व्यक्त करतात. परंतु या तरुणांना धमकावण्याचा प्रकार त्यांच्या भागांमध्ये स्थानिक पोलिसांकडून होत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणा-या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभे राहू. या तरुणांच्या विरोधात नोटिसा व खटले भरले जात आहेत. त्यासंबंधी कायदेशीर सल्लागारांमार्फत सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील देव गायकवाड नावाचे फेक अकाऊंट प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version