Home देश डॉ. नेमाडेंचे साहित्य नवोदितांना प्रेरणादायी

डॉ. नेमाडेंचे साहित्य नवोदितांना प्रेरणादायी

0

महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांचे पारंपरिक संबंध असून, देशाच्या रक्षणासाठी पंजाबने मोठी कुर्बानी दिलेली आहे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंजाबच्या योगदानाची प्रशंसा केली.

संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान (पंजाब)– महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांचे पारंपरिक संबंध असून, देशाच्या रक्षणासाठी पंजाबने मोठी कुर्बानी दिलेली आहे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंजाबच्या योगदानाची प्रशंसा केली.

पंजाबमध्ये मराठी संमेलन भरणे हा एक अपूर्व योग असून, हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन करताना पवार म्हणाले की, हे नवीन साहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरेल.

पवार पुढे म्हणाले की, देशात अन्नधान्याची कमतरता असताना पंजाबने अन्नधान्य पुरवण्यासाठी घाम गाळला आहे. मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेवांनी संतविचारांची पताका पंजाबमध्ये फडकवली. संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे हेही औचित्यपूर्ण असल्याचे पवार यांनी सांगितले.

मोठय़ा शहरांतून मराठी शाळा हद्दपार होत आहेत. मराठी भाषा शिकणे नव्या पिढीला कमीपणाचे वाटते आहे, याबद्दल चिंता व्यक्त करून, संतुलित मराठी अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले. मराठी भाषा आधुनिकतेची कास धरत नाही, असे काही जण सांगतात. त्यासाठी मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, मराठी संमेलन घुमानला होत असल्याचा विशेष आनंद होत असून, त्याचे श्रेय स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि सरहद या संस्थेचे संजय नहार यांना द्यावे लागेल. हे संमेलन म्हणूनच देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, साहित्यातील विचारांची ताकद मोठी आहे. त्यातून संघर्षाची प्रेरणा मिळते. गुरू गोविंदसिंगांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून मराठी माणसालाही ती मिळाली.

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल म्हणाले की, नामदेव जसे इथे आले, तसे गुरू गोिवदसिंग यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातले नांदेड हे ठिकाण संबंध मजबूत करण्यास कारणीभूत ठरले. पंजाबमधील युवकांनी देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्र आणि पंजाबमधले अतूट नाते जपणारी आपली राजकीय आणि संत परंपरा संतश्रेष्ठ नामदेवांपासून सुरू होते. त्यांच्यासह महाराष्ट्रातल्या थोर संत परंपरेने केवळ धर्मसंप्रदायाचा घोष न करता श्रेष्ठ वाङ्मयीन परंपरेचा घोष करताना आपल्यातील विवेक शाबूत ठेवत मनुष्यत्व जपण्याचा मार्ग दाखवला.

संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंग या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे सोपवली. मोरे यांना साहित्य महामंडळातर्फे एक लाख रुपयांचा धनादेश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि त्यांच्या पदाधिका-यांनी सुपूर्द केला. उद्घाटन समारंभापूर्वी ध्वजारोहण, तसच ग्रंथिदडी आणि ग्रंथप्रदर्शनाचेही उदघाटन झाले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला म्हणाले की, घुमानला संमेलन घेणे ही अतिशय अवघड गोष्ट होती, पण घुमानचे रहिवासी ते पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सहकार्यामुळेच आजचा आनंदाचा यशस्वी दिवस पाहता येतो आहे. हे संमेलन म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.

संमेलनापूर्वीच संत नामदेवांच्या नावाने इथे एक महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यामुळे या संमेलनाची फलश्रुती ते सुरू होण्यापूर्वीच झाली! उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर साहित्य व ललितकला अनुबंध आणि नृत्याविष्कार ‘नृत्यबानी’ हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version