Home महामुंबई डेंग्यू – सिने कलाकारांना पालिकेची नोटीस

डेंग्यू – सिने कलाकारांना पालिकेची नोटीस

0

बॉलिवूड कलाकारांच्या बंगल्यातही डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांकडून अनिल कपूर, जुही चावला व जितेंद्र यांच्या घरांची तपासणी केल्यावर त्यांच्या घरी डासांची उत्पत्तीस्थाने सापडली आहेत.

मुंबई- बॉलिवूड कलाकारांच्या बंगल्यातही डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांकडून अनिल कपूर, जुही चावला व जितेंद्र यांच्या घरांची तपासणी केल्यावर त्यांच्या घरी डासांची उत्पत्तीस्थाने सापडली आहेत. त्यामुळे या कलाकारांना पालिकेकडून नोटीस बजावली आहे. यावरून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या आजाराबाबत जनजागृती होताना सिने-कलाकारांच्या बेफिकिरीमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, असे म्हटलास चुकीचे ठरणार नाही.

झोपटपट्टय़ांबरोबरच अनेक ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत आहे. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिका-यांनी ५ लाख ४३ हजार ८६६ घरांची तपासणी केली. ४ लाख ६५ हजार ८८१ पाण्याच्या टाक्या, पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यापैकी १ हजार ४६८ पाणी साचलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळले. गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांच्या घरी व घराच्या आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूची उत्पत्तीस्थाने सापडली होती. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढतात. त्यानुसार, यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून या आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, पिंपांवर झाकण असले तरी थोडीशी फट असते. त्यातून डास आत जाऊ शकतात.

या छोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिल्यास डेंग्यूच्या डासांची पैदास रोखता येऊ शकते. याशिवाय, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडू शकत नाही, असा चुकीचा समज जनतेत आहे. यामुळे पालिकेच्या म्हणण्याकडे ते दुर्लक्ष करतात. पण, डेंग्यूचे डास श्रीमंत व गरीब अशा भेद करत नाही. त्यामुळे झोपडपट्टय़ांप्रमाणेच उच्चभ्रू वस्त्यांमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे मत साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी व्यक्त केले.
कलाकारांचे सहकार्य अपेक्षित डेंग्यूच्या उत्पत्तीस्थानाची तपासणी व औषध फवारणी करणा-या महापालिकेला सिनेकलाकार सहकार्य करत नसल्याचे पालिका कर्मचा-यांनी म्हटले आहे.

मागील दोन वर्षापासून पालिका प्रशासनातर्फे डेंग्यू व मलेरियाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या आजाराची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, बसेसवर व रस्त्यांवर फलक किंवा जाहिरातीच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, या आजाराला आळा घालण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आपल्यापरिने ठोस उपाययोजना करत असताना नागरिकांची सुद्धा साथ मिळणे अपेक्षित आहे, तरच या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेड बांधल्या जातात. त्यातही पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची दाट शक्यता असते. काही दिवसांपूर्वी कलाकारांच्या घरी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे, प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. – डॉ. राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version