Home संपादकीय विशेष लेख डान्सबार पुन्हा थांबतील?

डान्सबार पुन्हा थांबतील?

0

कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. न्यायसंस्थेने दिलेल्या आदेशाचे पालन करायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राती लडान्सबारवरची बंदी उठवली आहे. ही बंदी पुन्हा कशी लागू करावी, याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू झाला आहे. महाराष्ट्राची एकूण सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा पाहाता डान्सबार महाराष्ट्रातून हद्दपार होणे, आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका करताना कायद्याच्या कसोटीवर आपले म्हणणे टिकेल, अशा पद्धतीने नव्याने प्रयत्न करावे किंवा चालू अधिवेशनात नव्याने कायदा करून राज्य सरकारने डान्सबार पुन्हा बंद होतील, याची काळजी घ्यावी. असे झाले तर सर्वसामान्य माणूस सरकारचे मनापासून आभारच मानतील.

गर्दसारख्या अंमलीपदार्थाचे सातत्याने सेवन करण्याची सवय, जुगाराचे व्यसन आणि वेश्यागमन यात गुंतलेल्या व्यक्तींच्या नशिबी स्वत:सह आपला संसारही उद्ध्वस्त करून घेण्याखेरीज दुसरे काहीही नसते. २२ ते २५ हजार पगार मिळवणारा नवरा पगार घेऊन घरी येईल तेव्हा नवे काय खरेदी करायचे, याचा विचार करीत त्याच्या वाटेकडे पत्नी डोळे लावून बसलेली असते. बाबा काय खायला घेऊन येणार? यासाठी त्याची वाट बघणारी मुले यांची सगळीच हौस पती घरी आल्यानंतर अनेकदा मातीमोल होण्याचे प्रसंग घडतात. कारण एवढा पगारदार नवरा जुगाराच्या व्यसनापायी सारा पगार घेऊन पहिल्या तारखेलाच जुगाराच्या अड्डय़ावर जातो. रात्री घरी परत येतो तेव्हा खिशात कधी पाच, सात, बारा किंवा कधीकधी २५-२७ रुपयेच उरलेले असतात. दर महिन्याला पगार झाला की, यापेक्षा वेगळे काही घडत नाही. 

बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी, चांगले टू-बीएचकेचे घर आणि दृष्ट लागण्याजोगा संसार अशा वैभवातून दोन लहानग्या मुलांसह कुठल्यातरी इमारतीत जिन्याखालच्या खोलीत वास्तव्य करणारी महिला, नव-याची नोकरी गेलेली आणि तो कुठे आहे, याचा पत्ताही नसलेल्या अवस्थेत नशिबी आलेले जीणे ती माऊली जगत होती. ही एवढी राखरांगोळी तिच्या नशिबी आली ती नव-याच्या जुगाराच्या व्यसनापायी. अशा अनेक महिला शहरांमध्ये, गाव-खेडय़ात परिस्थितीशी टक्कर देत जगत आहेत. व्यसनी लोकांची हौस भागवणारे सर्व प्रकारचे अड्डे आता बहुतेक सर्वत्रच उपलब्ध झाले आहेत. त्यात आता भर पडण्याची शक्यता आहे, ती डान्सबारची. थेट सर्वोच्च न्यायालयानेच डान्सबारवरील बंदी उठवली ती मुख्यत्वे दोन कारणांमुळे. जगण्याचा अधिकार प्रत्येकाला असून स्वत:साठी आणि स्वत:वर अवलंबून असणा-यांसाठी अन्नाची मूलभूत गरज भागवण्यासाठी प्रत्येकाला मिळकतीचा अधिकार आहे. डान्सबारवर बंदी घालून राज्य सरकारने तेथे काम करणा-यांनाघटनेने दिलेल्या या मूलभूत अधिकारांवर बंधन, नियंत्रण आणले आहे. हे यातील एक कारण असून महाराष्ट्रातील पंचतारांकित हॉटेलमध्ये तेथे उतरणा-या पाहुण्यांच्या मौजेसाठी नृत्याला परवानगी आणि डान्सबारवर बंदी ही विसंगती असल्याचेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने राज्य सरकारला खूप मोठा धक्का बसणे साहजिकच आहे. अक्षरश: एका दिवसात राज्यभरातील सगळे डान्सबार बंद करून सरकारने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलले होते. सरकारच्या या निर्णयाने राज्यभरातील बारमध्ये काम करणा-या सुमारे ७५ हजार कर्मचा-यांच्या पोटावर पाय आला होता, असा दावा बार कर्मचा-यांच्या कथित नेत्यांनी केला असला तरी त्यात फारसे तथ्य नाही. या कर्मचा-यांची संख्या १५-२० हजार इतकीच असावी, असा माहीतगारांचा अंदाज आहे.

मुंबई पोलीस कायदा-२००५ मध्ये दुरुस्ती (अमेंडमेंट) करून सरकारने डान्सबारवर बंदी घातली होती. आता अध्यादेश काढून पुन्हा डान्सबारवर बंदी घालावी, असा एक मतप्रवाह सरकारमधील काही जणांचा असला तरी सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने अध्यादेश काढणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्याऐवजी अधिवेशनात नव्याने कायदा करून त्याच्या आधारे डान्सबारवर पुन्हा बंदी घालावी, असे मत खुद्द मुख्यमंत्र्यांसह काही मान्यवर मंत्र्यांचे आहे. ‘पैसा फेको, तमाशा देखो’ या एकाच गोष्टीभोवती डान्सबारचे सारे अर्थकारण फिरत असते. जिथे नृत्यांगना असतात, त्यांच्या मादक अदा असतात, तिथे त्यांच्यावर पैसा उधळणा-यांची संख्याही थक्क करणारी असते. दिवसभराच्या कमाईतील हजारो रुपये बारबालांवर उडवणारे अनेक लक्ष्मीपुत्र असतात. पैसे उडवण्यात त्यांच्यात सुरू असणारी स्पर्धा ज्याला पाहायला मिळते ते फक्त अचंबितच होतात. डान्सबारचा सर्वात मोठा वाईट परिणाम म्हणजे वाढती गुंडगिरी. नामचीन गुंडांना आणि त्यांच्या साथीदारांना दोन नंबरचा पैसा कुठेतरी उडवायचाच असतो. अशा व्यक्तींना डान्सबार हे काही काळापुरते तरी चांगले आश्रयस्थान वाटते. गुंडांची अनेक कटकारस्थाने डान्सबारमध्येच शिजतात. एकाच रात्री, एकाच बारबालेवर लाखो रुपये उधळले ते अब्दुल करीम तेलगीने. त्यातूनच हा तेलगी पोलिसांच्या हाती लागला.

व्यवसाय बंद करेन, पण पैसे उधळण्याच्या स्पर्धेला आणि त्यातून सुरू होणा-या भाई लोकांच्या दादागिरीला मुळीच भीक घालणार नाही, असा आदर्श घालून दिला तो लालबागच्या हनुमान थिएटरचे मालक मधुकर नेराळे यांनी. त्यांच्या हनुमान थिएटरमध्ये मराठीतील एकापेक्षा एक सरस अशा नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करायच्या. ख-याखु-या रसिकांचा त्यांच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा. या नृत्यांगना म्हणजे आपल्या मुलीच आहेत, असे समजून नेराळेशेठ त्यांच्यासाठी घासातला घास राखून ठेवायचे. एकाच चुलीवर शिधा शिजायचा आणि सर्वाची जेवणे एकत्र व्हायची. असे सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे चालले असताना अचानक हनुमान थिएटरला नजर लागल्यासारखे झाले. गुंडांचा वावर थिएटरमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. नोटांची चळत समोर ठेवून हे गुंड आपल्याला हव्या तशा पद्धतीने नृत्यांगनांना नाचण्यास भाग पाडू लागले. एका गँगचे गुंड येतात म्हणून प्रतिस्पर्धी गँगचे गुंडही येऊ लागले. त्यातून जिथे खरोखरीची नृत्ये व्हायची, तिथे नृत्यांचा बाजार सुरू झाला. अधुनमधून गुंडांकडची हत्यारेही दृष्टीस पडू लागली. तमाशा कलेवर निस्सिम प्रेम करणा-या आणि तमाशा क्षेत्रातील नृत्यांगनांना बहिणीच्या, मुलीच्या मायेने सांभाळणा-या मधुकर शेठजींसाठी आपल्या थिएटरमध्ये सुरू असलेले प्रकार असहय़ होणे स्वाभाविक होते. त्यातूनच एका उद्विग्न क्षणी त्यांनी हनुमान थिएटरच बंद करून टाकले. कालांतराने त्यांनी थिएटरच्या प्रशस्त जागेवर मंगल कार्यालय सुरू केले. जिथे ढोलकी कडकडायची तिथे सनईचे मंजुळ स्वर निनादू लागले आणि विवाह बंधनाच्या गाठी बांधल्या जाऊ लागल्या.

हनुमान थिएटरबरोबरच असला चांगुलपणा काळाच्या पडद्याआड गेला आणि महाराष्ट्रभर डान्सबारचे उदंड पीक उगवले. मुंबईत तर डान्सबारचा धंदा प्रचंड तेजीत सुरू झाला. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घातल्यानंतरही काही ठिकाणी पोलिसांच्या आश्रयाने डान्सबार सुरूच असायचे. अधुनमधून, मग यातल्याच काही बारवर छापे टाकल्याने नाटक वठवले जायचे, काही बारबालांना आणि ग्राहकांना अटक केल्याची दृश्ये वाहिन्यांवर पाहायला मिळायची. पण हा साराच प्रकार ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ अशा थाटात असायचा. डान्सबारमध्ये नाचणा-या मुली हा तर अत्यंत भयानक प्रकार असायचा. नृत्याची आणि त्यांची बहुधा ओळखही नसावी. श्रीमंत आणि अतिश्रीमंत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढायचे, अत्यंत अश्लील आणि किळसवाणे हावभाव करून त्यांची अक्षरश: लुटमार करायची, हे एकच काम बारमधील डान्सर करायच्या. यातून काही बारबालांनी इतका पैसा कमावला की, कोटय़धीश लोकांनाच परवडतील, अशा वसाहतीत काही बारबालांच्या सदनिका असल्याचे आढळून आले होते. त्यांच्या त्या आलिशान सदनिकांवर छापेही पडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डान्सबारचा हा धिंगाणा पुन्हा सुरू होईल. पण, लोकांना, समाजाला हा धिंगाणा अजिबात नको आहे. सरकारवर सर्वाच समाजघटकांचा दबाव वाढल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा समाज आणि सरकारने एकत्र येऊन डान्सबार कायमस्वरूपी बंद कसे करता येईल, याबाबत निर्णय घ्यावा.

[EPSB]

अखंड सेवाव्रती

भारतातील प्रमुख बंदरांतील बंदर व गोदी कामगारांचे लढाऊ नेतृत्व व ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. सदानंद कृष्ण शेटय़े यांच्या वयाला ३१ जुलै २०१३ रोजी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. कोकणात जन्मलेल्या शेटय़े यांच्यावर लहानपणापासून निसर्गाचा, पर्यावरणाचा संस्कार झाला. शालेय जीवनापासून राष्ट्र सेवा दलात काम करत असल्यामुळे साने गुरुजींच्या विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version