Home महामुंबई ठाण्यात ‘सोशल पोलिसिंग’चा नवा फंडा

ठाण्यात ‘सोशल पोलिसिंग’चा नवा फंडा

0

सोसायटी किंवा अपार्टमेंटमधील रहिवाशांसोबत संवाद साधून चोरटय़ांना अटकाव घालण्यासाठी ते वेगवेगळय़ा शकला लढवत आहेत.

ठाणे- चोर आला आणि चोरी करून गेला, या घटना शहरवासीयांसाठी नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्यात सुट्टीचा एप्रिल- मे महिना म्हटला की चोरटय़ांसाठी सोन्याहून पिवळं असाच दिवस. घराचा कडी-कोयंडा फोडून ऐवज लांबवला, अशा तक्रारींनी ठाणे पोलिसांना हैराण करून सोडल्याने त्यांनी आता ‘सोशल पोलिसिंग’चा नवा फंडा राबवण्याचे ठरवले आहे. सोसायटी किंवा अपार्टमेंटमधील रहिवाशांसोबत संवाद साधून चोरटय़ांना अटकाव घालण्यासाठी ते वेगवेगळय़ा शकला लढवत आहेत.

दरवर्षी सुट्टय़ांच्या काळात घरफोडींचे प्रमाण वाढते. मनुष्यबळाची कमरता असल्याने पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. हे लक्षात घेऊन पोलिसांनी आता चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यायचे ठरवले आहे. सोसायटीतील सदस्यांच्या सभा घेण्यासही पोलिसांनी सुरुवात केली आहे. तसेच नव्या इमारतींमधील रहिवाशांनाही सावधानतेचे धडे पोलिसांकडून दिले जात आहेत. नव्या इमारतीमधील सुरक्षारक्षक कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. याची बारिकसारिक माहिती इमारतीमधील सदस्यांना ठेवण्यास सांगितले जात आहे. अनेक घरफोडीच्या घटनांत सुरक्षारक्षकच चोरटय़ांना साथ देत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांवर प्रथम नजर ठेवण्याची सूचना रहिवाशांना दिली जात आहे.

कशी बाळगाल जागरूकता?

गावी अथवा बाहेरगावी जाताना शेजा-यांना सांगून जा. त्यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगा. मौल्यवान दागिने तिजोरीत ठेवा. इमारतीमधील अनेक रहिवाशांकडे चारचाकी गाडय़ा असतात. काही ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने या गाडय़ा इमारतीच्या बाहेरच उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे गाडीतील स्पीकर, लोगो चोरीला गेल्याच्या अनेक घटना वाढत आहेत. अशा गाडय़ांना ‘जीपीआरएस’ यंत्रणा लावून घेण्याच्या सूचना ठाणे पोलिस सोसायटीमधील रहिवाशांना करत आहेत. कामाच्या वाढत्या व्यापामुळे पोलिसांना प्रत्येक इमारतीवर वैयक्तिक लक्ष ठेवणे किंबहुना त्यांना संरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे ‘सोशल पोलिसिंग’चा प्रयोग राबवला जात आहे. जनतेनेही जागरूकता बाळगल्यास घरफोडी, चोरीसारख्या घटना रोखणे सहज शक्य असल्याचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे म्हणणे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version