Home क्रीडा जोकोविचला इंडियन वेल्स स्पर्धेचे जेतेपद

जोकोविचला इंडियन वेल्स स्पर्धेचे जेतेपद

0

दुसरा मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविचने सातव्या मानांकित रॉजर फेडररचा पराभव करत बीएनपी पॅरिबास ओपन डब्लूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

इंडियन वेल्स- थरारक लढतीत स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररवर ३-६, ६-३, ७-६(७/३) असा विजय मिळवत जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने बीएनपी पॅरिबस ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

रविवारी झालेल्या अंतिम फेरीत ३२ वर्षीय फेडररने जोकोविचची सव्‍‌र्हिस भेदताना केवळ ३१ मिनिटांत पहिला सेट जिंकला. दुस-या सेटमध्ये फेडररने सातत्य राखले तरी आठव्या गेममध्ये ‘ब्रेकपॉइंट’ मिळवत जोकोविचने लढतीत पुनरागमन केले. त्यानंतर सेटही जिंकला. तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये दोघांनीही चुरशीचा खेळ केला. या सेटमध्ये सुरुवातीला जोकोविचकडे २-१ अशी आघाडी होती. त्यानंतर ५-४ अशी आघाडी असताना फेडररने त्याची सव्‍‌र्हिस भेदली. मात्र ‘टायब्रेकर’मध्ये जोकोविचने खेळ उंचावत बाजी मारली. वर्षातील त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे.

२००८ आणि २०११ मध्ये अजिंक्य ठरलेल्या जोकोविचचे हे या स्पर्धेतील तिसरे तसेच कारकीर्दीतील १७वे मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद आहे. त्याने माजी विजेता फेडररला पाचव्या (२००४, २००४, २००६ आणि २०१२) जेतेपदापासून रोखले. सर्वात वयस्कर विजेता बनण्याचे फेडररचे स्वप्न भंगले. सर्वात वयस्कर विजेता बनण्याचा मान माजी टेनिसपटू आंद्रे अगास्सी यांच्याकडे जातो. त्यांनी ३४व्या वर्षी सिनसिनाटी (२००४) स्पर्धा जिंकली होती.

महिलांमध्ये फ्लॅव्हिया पेनीटाची बाजी 

बीएनपी पॅरिबस ओपन टेनिस डब्लूटीए स्पर्धेत इटलीच्या फ्लॅव्हिया पेनीटाने बाजी मारली. अंतिम फेरीत रविवारी तिने जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या पोलंडच्या अग्निस्झ्का रॅडवँस्काला ६-२, ६-१ असे सरळ सेटमध्ये हरवले. ३२ वर्षीय पेनीटाने ‘फायनल’मध्ये दुस-या सीडेड रॅडवँस्काला प्रतिकाराची संधी दिलीच नाही. मात्र डाव्या पायाच्या दुखापतीमुळे रॅडवँस्काला अपेक्षेप्रमाणे खेळ उंचावता आला नाही. पेनीटाचे हे १०वे डब्लूटीए जेतेपद आहे. २०१० नंतर (मार्बेला) तिला प्रथमच डब्लूटीए स्पर्धा जिंकता आली.

सानिया-काराला उपविजेतेपद 

भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी झिम्बाब्वेची कारा ब्लॅकला बीएनपी पॅरिबस ओपन डब्लूटीए स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत रविवारी पाचव्या सीडेड सानिया-काराला अव्वल सीडेड तैवानच्या सी-सु-वी आणि चीनच्या पेंग शुआइकडून ७-६(५), ६-२ असे पराभूत व्हावे लागले. वी आणि शुआइने डब्लूटीए दुहेरीच्या ‘फायनल’मधील आपले वर्चस्व राखताना ११-० अशी बाजी मारली आहे. सानियाला केवळ एकदा बीएनपी पॅरिबस ओपन डब्लूटीए स्पर्धेच्या महिला दुहेरीत जेतेपद मिळवता आलेय. २०११ मध्ये एलिना व्हेस्निनासह तिने अजिंक्यपद पटकावले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version