Home महाराष्ट्र जांभूळवाडीतील आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

जांभूळवाडीतील आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

0

नेरळ तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायतीमधील जांभूळवाडीतील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नेरळ- तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायतीमधील जांभूळवाडीतील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा करणारी विहीर तीन वर्षापासून मोडकळीस आली आहे. मात्र, विहिरीच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने येथील आदिवासींना पाण्यासाठी तीन किमी असलेल्या ओहोळावरून पाणी आणावे लागत आहे.

मोगरज ग्रामपंचायतीमधील ३५ घरांची वस्ती असलेली जांभूळवाडी येथील एका टेकडीवर वसली आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दरीमध्ये खोलगट भागात आहे. पावसाळयात दरडी कोसळून खाली येणारी माती विहिरीत साचल्याने निम्म्यापेक्षा जास्त विहीर मातीने भरली आहे. तर दरडीत कोसळलेल्या मोठ-मोठया दगडांनी विहिरीचे कठडे अनेक ठिकाणी पडले आहेत. गावातील पाण्याचा मुख्य स्रोत असलेली विहीर मोडकळीस आल्याने तीन वर्षापासून गावातील महिला पाण्यासाठी गावाच्या दुस-या बाजूने वाहणा-या ओहोळावर जातात. गावापासून ओहोळ दूर असल्याने महिलांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच ओहोळामध्येही फारच कमी पाणी असल्याने खड्डे खणून पाणी काढावे लागत असल्याची कैफियत एका ग्रामस्थांनी मांडली.

दरम्यान, गावातील पाण्याच्या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कळवले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने कर्जत पंचायत समितीला कळवण्यात आले. परंतु लघुपाटबंधारे विभागाने तीन वष्रे झाली तरी विहिरीतील माती काढलेली नाही किंवा कठडे दुरुस्त केले नाहीत. तसेच कर्जत पाणी आराखडा कृती समितीनेही जांभूळवाडीची समस्या सोडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवल्याचा, आरोप येथील आदिवासींनी केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version