Home टॉप स्टोरी जयंत पाटील यांनी काढले बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराचे वाभाडे

जयंत पाटील यांनी काढले बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराचे वाभाडे

0

फडणवीस सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात गेल्या पंधरा महिन्यांत नियमबाह्य पद्धतीने बदल्या आणि बढत्या झाल्या आहेत. 

मुंबई- फडणवीस सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात गेल्या पंधरा महिन्यांत नियमबाह्य पद्धतीने बदल्या आणि बढत्या झाल्या आहेत. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केला.

बेकायदा फायलींवर डोळे झाकून तुम्ही स्वाक्ष-या करत होता, असा ठपकाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ठेवला आहे. या बदल्या, बढत्यांसाठी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा तपशील माझ्याकडे आहे पण मी तो आता उघड करत नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी पाटील यांना दिला. माजी अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या काळातील सर्व बदल्या-बढत्यांची सखोल चौकशीची मागणीही पाटील यांनी केली.

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना पाटील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी आणलेल्या बेकायदा फायलींवर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री फडणवीस हे कोणत्या प्रेरणेने स्वाक्ष-या करत होते, असा जाब विचारून पाटील म्हणाले की, ‘कुलकर्णीनी या खात्यातील अधिकारी-कर्मचा-यांवर वरवंटाच फिरवला. मनमानी पद्धतीने बदल्या करून अधिका-यांच्या मागे चौकशा लावल्या. अनेक मोठया अधिका-यांना निलंबित केले व पुन्हा तातडीने कामावरही घेतले. हे सारे होताना आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.

हिवाळी अधिवेशनात कुलकर्णी कुणाच्या पैशाने नागपुरात पंचतारांकित हॉटेलात थांबले होते, ते नाईट ड्रेसवर मुख्यमंत्र्यांना भेटायला कसे जाऊ शकतात. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या फायली सामान्य प्रशासन खात्याकडे पाठवल्यानंतर लगेच त्या विभागाकडे माहितीच्या अधिकारात स्वत:च त्याच फायलींविषयी कसे काय प्रश्न केले, असे सांगत हे अनेक सचिवांना केलेले ब्लॅकमेलिंग नाही का, असा सवाल पाटील यांनी केला.

टोल संस्कृती मीच आणली. मीच ती बंद करू शकतो, असे भाजपाचे नेते नितीन गडकरींनी म्हटल्याची आठवण देऊन पाटील म्हणाले की, ‘तुम्ही काही टोल बंद केलेत पण त्यापेक्षा अधिक संख्येने टोल सुरूच आहेत. मुंबईचा टोल तुम्ही कधी बंद करणार? असा सवाल पाटील यानी केला.

टोलसाठी कुलकर्णीची समिती नेमलीत पण त्यांनी दोनच बैठका घेतल्या. बारामती व अमरावती शहरात सुरू असलेले टोल बंद का करत नाही, असा सवाल पाटील यांनी केला. तरीही आनंद कुलकर्णी यांना मुख्यसचिव करण्याचा डाव फडणवीस सरकारचा होता, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version