Home महामुंबई ठाणे जमा-खर्चाच्या पारंपरिकतेला फाटा

जमा-खर्चाच्या पारंपरिकतेला फाटा

0

महसुली उत्पन्नाच्या जमा आणि खर्चाच्या पारंपरिकतेला फाटा देत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी सोमवारी २०१५-१६चा ११३५.९१ कोटी जमा आणि १०८९.३४ खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प, तसेच सन २०१६-१७चा १९५६.४४ कोटी जमा व १९५६.२७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले.

कल्याण – महसुली उत्पन्नाच्या जमा आणि खर्चाच्या पारंपरिकतेला फाटा देत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी सोमवारी २०१५-१६चा ११३५.९१ कोटी जमा आणि १०८९.३४ खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प, तसेच सन २०१६-१७चा १९५६.४४ कोटी जमा व १९५६.२७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले.

येत्या दोन दिवसांत महासभेत चर्चा करून हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल, असे स्पष्ट करत यावेळी गुरुवापर्यंत सभा तहकूब करण्याचे आदेश पीठासीन अधिकारी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांपैकी २ गावांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याने ही गावे वगळून इतर १२० प्रभागांसाठी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

यात मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, पाणीपट्टी या पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांसह स्थायी समितीने उत्पन्नाच्या नव्या बाजू प्रशासनापुढे ठेवत एकूण ११२०.९३ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवाय, शासनाच्या विविध प्रकल्पांतून ७५९.७८ कोटींचा निधी मिळणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले. यात वाहतुकीचे नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि आरोग्य, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे नियोजन, उद्यान व मनोरंजन केंद्र, अग्निशमन सक्षमीकरण, शहरात ठिकठिकाणी भाजी मार्केट आणि फिश मार्केट, २७ गावांच्या मूलभूत सुविधांसाठी विशेष नियोजन अशा विविध कामांचा समावेश आहे.

असे असतील उत्पन्नाचे नवे स्रोत

या अर्थसंकल्पात पारंपरिक स्रोतांव्यतिरिक्त उत्पन्नाचे काही नवीन स्रोतही समाविष्ट करण्यात आले आहेत. आरक्षित भूखंडांवर वाहनतळ, भाजी मंडई, बहुउद्देशीय सभागृह, बाजार परवाना फी, नाटय़गृहात एलईडी जाहिरात नियोजन आदी माध्यमातून पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचे नियोजन यात करण्यात आले आहे. तसेच रस्ते, गटार आणि नळाचे मीटर यापलीकडे जाऊन प्रथमच शहर आणि ग्रामीण भागांच्या मूलभूत सुविधांपासून बाजारपेठा, उद्याने, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण आदी विकासकामांचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version