Home क्रीडा जपानला आघाडी राखण्यात अपयश

जपानला आघाडी राखण्यात अपयश

0

बेल्जियमकडून २-३ असा निसटता पराभव; आता गाठ ब्राझीलशी

रोस्टोव्ह-ऑन-डॉन – उत्तरार्धात ५२व्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेऊनही फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीच्या ‘राउंड ऑफ सिक्स्टिन’मधील लढतीत सोमवारी जपानला बेल्जियमविरुद्ध २-३ अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या पराभवामुळे विश्वचषक स्पर्धेतील आशिया खंडाचे आव्हान संपुष्टात आले.

बाद फेरीतील कामगिरी पाहता बेल्जियमचे पारडे जड होते. कट्टर प्रतिस्पध्र्याना मध्यंतरापर्यंत बरोबरीमध्ये रोखून जपानने अर्धी लढाई जिंकली होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीला अवघ्या ७ मिनिटांमध्ये दोन गोल करताना त्यांनी विजयाची पायाभरणी केली. गेन्की हारागुची याने ४८व्या मिनिटाला जपानचे खाते उघडले. त्यानंतर चार मिनिटांनी तकाशी इनुई याने त्यात भर घातली. आक्रमक आणि झटपट खेळ करत २-० अशी आघाडी घेतल्याने जपानच्या खेळाडूंसह चाहत्यांच्या चेह-यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, बेल्जियमने दडपण झुगारून पिछाडी भरून काढली आणि स्पर्धेतील आणखी एका नेत्रदीपक विजयाची नोंद केली.

जपानने झटपट दोन गोल करताना सामन्यात आघाडी घेतली. बेल्जियमनेही तशीच करामत साधताना बरोबरी साधली. याचे श्रेय जॅन व्हेटरेन्घेन (६९व्या मिनिटाला) आणि बदली मॅरॉएन फेलिनी (७४व्या मिनिटाला) यांना जाते. २-२ अशा बरोबरीनंतरही १६ मिनिटांचा खेळ शिल्लक असल्याने विजयाची संधी समसमान होती. मात्र, बरोबरीनंतर बेल्जियमचा आत्मविश्वास उंचावला आणि जपानचे खेळाडू दडपणाखाली आले. त्याचा फायदा बेल्जियमने उठवला.

शेवटच्या मिनिटाला दोन्ही संघांना आघाडी घेण्याची संधी मिळाली. मात्र जपानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. त्याच वेळी बेल्जियमच्या गोलरक्षकाने आघाडी फळीकडे चेंडू सोपवला. त्यावर नॅसेर चॅडली याने सुरेख गोल केला आणि संघाला ३-२ अशा आघाडीवर नेले. बाद फेरीमध्ये दोन गोलची पिछाडी भरून काढून विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या ४८ वर्षातील पहिला संघ आहे. १९७०मध्ये जर्मनी संघाने इंग्लंडविरुद्ध पिछाडी भरून काढताना ३-२ अशा फरकाने बाजी मारली होती.

साखळीमध्ये चमकदार खेळ करणा-या बेल्जियमने यंदाच्या विश्वचषकातील चार सामन्यांत एकूण गोलसंख्या १२ वर नेली. त्यांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ‘क्वार्टरफायनल’मध्ये बेल्जियमसमोर पाच वेळचा विजेता ब्राझीलचे आव्हान आहे. ‘राउंड ऑफ सिक्स्टिन’मध्ये सोमवारी पहिल्या फेरीत ब्राझीलने मेक्सिकोचा २-० असा पराभव करताना अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version