Home किलबिल जगणं उन्नत करणारी बालकविता

जगणं उन्नत करणारी बालकविता

0

‘खरंच सांगतो दोस्तांनो’ हा एकनाथ आव्हाड यांचा बालकुमारांसाठी नववा बालकवितासंग्रह अलीकडेच बाजारात आला आहे. या संग्रहात विषयांची विविधता आहे आणि कल्पनांची तरलता आहे. हा संग्रह वाचत असताना साने गुरुजींच्या ‘करील रंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभूशी तयाचे।।’ या ओळींची प्रचिती येते. ही कविता एकरंगी किंवा एकसुरी नाही. करमणुकीसोबतच काहीएक विचार देणारी ही कविता आहे. मुंबईसारख्या महानगरातील बालकुमारांना निसर्गाचे आकर्षण असणे स्वाभाविकच आहे. कवीला झाडांच्या खांद्यांवर पाखरांची गाणी भेटतात.

‘बाहू पसरून झाडे। घेती कवेत आभाळ।
आभाळाच्या गळ्यात । सावळ्या मेघांची माळ।’

असा नितांत सुंदर निसर्ग आपल्याला या कवितेत भेटतो. हाच निसर्ग कवीला आणि पयार्याने बालकुमारांना देण्यातला खरा आनंद लुटण्यास शिकवितो. निसर्गाचा नवा रंग, नवा गंध मनास नवेपण देऊन जातो. निसर्गाचा हिरवा धडा वाचताना मनाची सारी मरगळ गळून जाते. मनाला नवी पालवी फुटते. बालमनाला धो धो कोसणारा आणि प्रलय करणारा पाऊस आवडत नाही. गरिबांचे हाल करणारा लहरी पाऊस आवडत नाही, तर रिमझिम बरसणारा आणि जीवनगाणे फुलवणारा पाऊस आवडतो.

‘पाऊसधारा, भिजला वारा, सजली पाने फुले।
कुणी बांधिले झाडांवरती, आनंदाचे झुले।’

असा प्रश्न कवीला पडतो. साजिरा गोजिरा श्रीरंग श्रावण आकाशावर इंद्रधनुष्याचे तोरण बांधतो, हे बालमनाला अधिक भावते. आव्हाडांची बालकविता बालसुलभ असली, तरी ती बाळबोध नाही. प्रौढ वाचकांनाही ती तितकीच भावते. आपली जन्मभूमी (गाव) आणि आपली मातृभूमी (देश) याविषयीची कृतज्ञता या कवितेतून फार जोरकसपणे व्यक्त झाली आहे. ‘माझा गाव’ या कवितेत प्रगतिशील गावाचे वर्णन आले आहे, तर ‘ऋण’ या कवितेत देशाविषयीचा आदरभाव व्यक्त झाला आहे.

‘याच मातीत वाढलो, तिचं ऋण फेडायचंय। या मातीच्या कणांशी, नवं नातं जोडायचंय’ अशा शब्दांत कवीने आपली बांधिलकी व्यक्त केली आहे. नव्या युगातील ह्या बालकुमारांना प्रगतीचे पंख लावून उडायचं आहे. जातीपातीच्या विषमतेला याच मातीत गाडायचं आहे. या मातीच्या वेदनेला दूरदूर धाडायचं आहे. बालकुमारांना होणारी ही माणुसकीची जाणीव फार महत्त्वाची आहे. ‘आई’ हा तर प्रत्येक कवीच्या अंत:करणाचा हळवा कोपरा असतो. तसा तो आव्हाडांचाही आहे. सदर संग्रहात आईविषयी दोन कविता आहेत. बालमनावर धाडसाची, परिश्रमाची, चिकाटीची आणि श्रमाची संस्कार शिल्पे कोरणारी आई म्हणजे सुसंस्कारांची खाणच होय. जशी आई ही बाळाचा पहिला गुरू असते, तसे प्रकाशाचे पाठ देणारे शाळेतील गुरुजी हे दुसरी आईच असतात. अशा गुरुजींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवीने लिहिले आहे :

‘तुमच्यामुळेच गुरुजी। आयुष्य बहरून आले
कसे सांगू तुम्हाला। जगणे आनंदाचे झाले!’

नवे कपडे, गोडधोड पदार्थ, दिव्यांची आरास, फटाक्यांची आतषबाजी, म्हणजेच केवळ दिवाळी नव्हे, तर याही पलीकडच्या ‘नव्या दिवाळीचे’ चित्र कवीने उभे केले आहे.

‘नको ते फटाके । नको दिव्य रोषणाई।
चैनविलासात दिवाळी। कोमेजून जाई।’

या शब्दांत कवीने बालकुमारांमध्ये सामाजिक जाणीव रुजविण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो फारच स्तुत्य आहे.
या कवितांमधून जसे आई आणि मित्र यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त झाले आहे, तसेच छ. शिवाजी महाराज आणि म. फुले यांचे कृतज्ञ स्मरणही केले आहे. ‘आईस पत्र’ ही कविता म्हणजे उत्कट पत्रलेखनाचा काव्यमय नमुना आहे. ‘गवताची पाती’ या कवितेतून बालमनावर एकजुटीचे सामर्थ्य बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.

‘माझ्यावर एक कविता लिहा’ आणि ‘एका कवितेची कहाणी’ ही दोन कथाकाव्ये आहेत आणि ती दोन्ही भावस्पर्शी उतरली आहेत. ‘खरंच सांगतो दोस्तांनो’ ह्या संग्रहाच्या शीर्षकाच्या कवितेत शालेय जीवनातील गंमतीजमती, स्पर्धा, यशापयश यांचे मनोहारी वर्णन आले आहे.
बालकुमारांच्या वारंवार हाताळण्याने पुस्तके लवकर गलितगात्र होतात. तसे होऊ नये म्हणून या पुस्तकासाठी जाड कागद वापरला आहे. कवितेला रंगीत चित्रांची जोड दिल्यामुळे संग्रहाच्या सौंदर्यात भर पडली आहे. एकनाथ आव्हाड यांना बालमानसशास्त्राची चांगली जाण असल्यामुळे त्यांची प्रत्येक कविता वाचनीय झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version