Home टॉप स्टोरी जगज्जेतेपदाची लढत पुढे ढकलण्याच्या शक्यतेने विश्वनाथन आनंद नाराज

जगज्जेतेपदाची लढत पुढे ढकलण्याच्या शक्यतेने विश्वनाथन आनंद नाराज

0

सोचीमध्ये (रशिया) नियोजित वेळेप्रमाणे ७ नोव्हेंबरपासून खेळली जाणारी बुद्धिबळ जगज्जेतेपदाची लढत मार्च २०१५ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याच्या बातमीने दस्तुरखुद्द माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद नाराज झाला आहे.

मुंबई – सोचीमध्ये (रशिया) नियोजित वेळेप्रमाणे ७ नोव्हेंबरपासून खेळली जाणारी बुद्धिबळ जगज्जेतेपदाची लढत मार्च २०१५ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याच्या बातमीने दस्तुरखुद्द माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद नाराज झाला आहे. पुण्यात ऑक्टोबरमध्ये होणा-या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेच्या घोषणेसाठी आनंद मुंबईमध्ये आला होता. तेथे त्याने ‘प्रहार’ला विशेष मुलाखत दिली.

‘‘सध्या तरी मी नोव्हेंबरमध्ये सोचीमध्येच लढत होईल, यादृष्टीने मनाची तयारी केली आहे. ‘फिडे’ची अध्यक्षपदाची निवडणूक दोन दिवसांतच (सोमवारी) होणार आहे. त्यात माजी जगज्जेता गॅरी कास्पारोव निवडून आले तर काहीच सांगता येणार नाही. कास्पारोव निवडून आले तर जगज्जेतेपदाची लढत पुढे जाईल, यात काही शंका नाही. मी लढत पुढे ढकलण्यात येईल, यादृष्टीने अजून मनाची तयारी केलेली नाही. मात्र जर तसे घडले तर ते मान्य करण्यावाचून पर्यायही नसेल. मात्र ‘फिडे’च्या निर्णयांबाबत बोलणे योग्य होणार नाही. ते पाहता लढत पुढे ढकलण्याच्या शक्यतेबद्दल बोलणे माझ्यासाठी कठीण आहे. अर्थातच केव्हाही लढत झाली तरी माझी तयारी पूर्ण असेल,’’ या शब्दांत पाच वेळचा जगज्जेता ठरलेला आनंदने नाराजी व्यक्त केली.

जगज्जेतेपदाच्या लढतीला अजूनही ‘स्पॉन्सर’ मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे. ‘‘स्पॉन्सरची समस्या प्रत्येक खेळाला आहे. मात्र जगज्जेतेपदाची लढत म्हटल्यावर ‘स्पॉन्सर’ मिळतील. ‘फिडे’ त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलेल, यात मला शंका नाही. तितकेच कशाला आता पुण्यामध्ये होणा-या जागतिक ज्युनियर स्पर्धेलाही अनेक ‘स्पॉन्सर’ मिळतील, अशी खात्री मला वाटते,’’ असे आनंदने सांगितले.  जगज्जेतेपदाच्या लढतीपूर्वी छोटासा ‘ब्रेक’ घेतल्याचे आनंद सांगतो. ‘‘सध्या मी थोडय़ा दिवसांसाठी विश्रांती घेतली आहे. मात्र बिल्बाओ (स्पेन येथे १३ सप्टेंबरपासून) येथे होणा-या युरोपियन क्लब कपमध्ये खेळणार आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीची तयारी म्हणून त्या स्पर्धेकडे पाहणार आहे,’’ असे आनंदने स्पष्ट केले.

भारताच्या बुद्धिबळातील प्रगतीवर आनंद खूष

भारताच्या बुद्धिबळातील प्रगतीवर आनंदने समाधान व्यक्त केले. ‘‘भारतातील ग्रॅँडमास्टर आणि महिला ग्रॅँडमास्टरची (३५) संख्या निश्चितपणे चांगली आहे. हा आकडा वाढत जाईल, यात शंका नाही. बुद्धिबळाकडे कारकीर्द म्हणून पाहणारी युवा मंडळी दिसायला लागली आहेत, ही समाधानाची बाब आहे. हरिकृष्ण, अभिजित गुप्ता, विदित गुजराथी, परिमार्जन नेगी आदी नावे घ्यावीत तेवढी थोडी आहेत. भारतात खेळ वाढावा, यासाठी बुद्धिबळ संघटनाही जोमाने प्रयत्न करत आहे,’’ असे आनंदने म्हटले.

..आणि आनंद रमला आठवणींत

आनंदने १९८७मध्ये बाग्यो (फिलिपाइन्स) येथे जागतिक ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. अर्थातच २७ वर्षापूर्वी घडलेल्या त्या आठवणींमध्ये आनंद रमला. ‘‘बाग्योमधील माझी पहिलीच वर्ल्ड ज्युनियर नव्हती. त्याआधीही मी वर्ल्ड ज्युनियर खेळलो होतो. बाग्योला मी गेलो तेव्हा माझ्यासोबत माझे आईवडिल होते. तेथे गेल्यावर मला कळले की काही ग्रॅँडमास्टरही खेळायला आले आहेत. सुरुवातीला मी स्पर्धेत थोडा पिछाडीवर होतो. मात्र आदल्यावर्षीच्या अनुभवातून धडा घेत मी बाजी मारली,’’ असे आनंदने सांगितले.

इवानचुकशी झुंज काढली मोडून

आनंद आणि त्याच्या वयोगटातील युक्रेनचा वॅसिली इवानचुक अजूनही ब-याच स्पर्धामधून आमनेसामने येतात. अजूनही दोघांमधील डाव रंगलेले दिसतात. मात्र हे डाव नवीन नाहीत. ‘‘१९८६ वर्ल्ड ज्युनियरमध्ये इवानचुकने मला पराभूत केले होते. मात्र १९८७मध्ये त्याला नमवण्यात मला यश आले. मी त्यावेळी जेतेपद पटकवले असले तरी इवानचुक दुस-या स्थानी होता इतका त्याचा त्यावेळी दमदार फॉर्म होता. आजही जेव्हा आम्ही समोरासमोर येतो तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याशी आजही खेळताना एक वेगळीच मजा वाटते,’’ असे आनंद म्हणाला.

‘बिझी’ आनंदची सवय झाली आहे

आनंदसोबत नेहमीच असणारी त्याची पत्नी अरुणा आनंदने आता तिच्या पतीच्या व्यग्र कार्यक्रमाची सवय झाली असल्याचे म्हटले. ‘‘आनंद आणि बिझी शेडयुल्ड काही नवीन नाही. मात्र आता मलादेखील त्यांच्यासोबत व्यग्र राहण्याची सवय झाली आहे. माझीदेखील आता बुद्धिबळाशी जवळीक झाली आहे अर्थातच तीदेखील आनंदमुळे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वातावरणात जुळवून घेण्याची मला लहानपणापासून सवय आहे. अर्थातच लग्नानंतर त्याचा मला फायदा झाला,’’ असे अरुणा आनंद यांनी म्हटले. आनंद आणि अरुणा यांचा मुलगा अखिल हा जेमतेम तीन वर्षाचा आहे. ‘‘अखिलनेही वडिलांप्रमाणे बुद्धिबळपटू व्हावे हा माझा आग्रह नाही. जर तो बुद्धिबळपटू झाला तर मी खूप खूष होईन. मात्र तो जी कारकीर्द निवडेल त्यात आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ. एक चांगला माणूस त्याने बनावे इतकीच आमची अखिलकडून अपेक्षा आहे,’’ असे अरुणा आनंद यांनी म्हटले.

विदित गुजराथी सज्ज

यंदा कारकीर्दीत शेवटची वर्ल्ड ज्युनियर (२० वर्षाचा असल्याने) स्पर्धा खेळणारा नाशिकचा विदित गुजराथीने यंदा पदक राखण्याची जिद्द बोलून दाखवली. ‘‘माझी ही अखेरची ज्युनियर प्रकारातील स्पर्धा आहे. या स्पर्धेतील विजेत्याला ग्रॅँडमास्टर टायटल दिले जाते. मी ग्रॅँडमास्टर आधीच झालो आहे मात्र या स्पर्धेला असलेले वलय पाहून मी खेळणार आहे. कास्पारोव, आनंदसारखे महान बुद्धिबळपटू ही स्पर्धा जिंकूनच घडले. गेल्यावर्षी मला या स्पर्धेतून कांस्यपदक मिळाले होते. ते पाहता आता ही स्पर्धा जिंकण्याच्यादृष्टीने मी प्रयत्न करेन,’’ असे २० वर्षाच्या विदितने (ज्युनियर स्पर्धेसाठी तिसरे रॅँकिंग) म्हटले. विशेष म्हणजे आनंदनेही यंदा विदितकडून चांगल्या कामगिरीची आशा असल्याचे म्हटले. कारण विदितने नुकतीच सोमवारी आर्मेनियातील ‘कॅटेगरी १६’ स्पर्धा जिंकली आहे.

सौम्याचाही आठवणींना उजाळा

पुण्यात राहणारी सौम्या स्वामिनाथने २००९मध्ये वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. ‘‘२००८मध्ये अभिजित गुप्ता आणि हरिकाने ही स्पर्धा जिंकल्यानंतरच मी जिद्द ठेवली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे २००९मध्ये मला ज्युनियर स्पर्धा जिंकता आली याचा अभिमान वाटतो. त्या विजयाचा आत्मविश्वास अजूनही मला सिनियर स्पर्धेत मिळतो,’’ असे २५ वर्षीय सौम्याने म्हटले. सौम्याकडे सध्या वुमन ग्रॅँडमास्टर टायटल आहे. त्याचवेळी ट्रॉम्सो (नॉर्वे) येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडला रेटिंग कमी असल्याने मुकल्याबद्दलही सौम्याने दु:ख व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आनंद

आनंदने शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या (एमसीए) पदाधिका-यांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. राज्य सरकारचे आगामी स्पर्धेला पूर्णपणे सहकार्य राहील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ‘‘मुख्यमंत्र्यांना बुद्धिबळाची चांगली आवड आहे हे पाहून छान वाटले. ते बुद्धिबळातील घडामोडींची सतत माहिती ठेवत असतात ही खूपच चांगली बाब आहे,’’ असे आनंदने आवर्जून पत्रकार परिषदेत सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version