Home संपादकीय अग्रलेख छोटे पक्ष – भवितव्य नाही..

छोटे पक्ष – भवितव्य नाही..

0

महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे. या छोटय़ा पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लेखा परीक्षण सादर केलेले नाही, प्राप्तीकर भरलेले नाही. राजकीय पक्ष म्हणून हिशेब ठेवलेला नाही. हे हिशेब निवडणूक आयोगाला सादरही केलेले नाहीत.

आज राष्ट्रीय स्तरावर देशात काँग्रेस, भाजपा या दोन पक्षांना अखिल भारतीय पक्ष म्हणून प्रामुख्याने मान्यता आहे. राष्ट्रवादी, बसपा या पक्षांनाही मान्यता आहे. शिवसेनेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे; परंतु बाकी जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षांना राष्ट्रीय मान्यता सोडून द्या.. प्रादेशिक मान्यताही मिळवणे अवघड आहे; पण हे पक्ष कोणत्याही तात्त्विक भूमिकेवरचे नाहीत. ते त्या-त्या नेत्यांचे पक्ष आहेत. रामदास आठवलेंचा ‘रिपब्लिकन पक्ष’, राजू शेट्टींचा ‘स्वाभिमानी पक्ष’, विनय कोरे यांचा ‘जनसुराज्य पक्ष’ किंवा विनायक मेटेंचा ‘शिवसंग्राम’ हे पक्ष त्या त्या व्यक्तीचे पक्ष आहेत. त्यातल्या त्यात रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातल्या अनेक क्षेत्रात प्राबल्य आहे. बाकी राजू शेट्टी किंवा विनायक मेटे हे जेमतेम स्थानिक पातळीवरील नेते आहेत किंवा तेवढेही नाहीत. भारतीय राजकारणाचे ध्रुवीकरण करताना निश्चितपणे काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. देश पातळीवरही छोटे पक्ष निर्माण करून आपले सामर्थ्य असो किंवा नसो, कोणती तरी पदे पदरात पाडून घेण्याकरिता हे छोटे पक्ष अलीकडच्या राजकारणात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे राजकीय ध्रुवीकरण तात्त्विक भूमिकेवर होतच नाही. या देशाच्या राजकारणात २०१४च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर एका राष्ट्रीय राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळवणे अलीकडे सोपे राहिलेले नाही. प्रादेशिक पक्षांची अनेक राज्यांत त्यामुळेच सरकारे आली. बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील, ओदिशात नवीन पटनायक असतील, तामिळनाडून कधी जयललिता कधी करुणानिधी हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक अस्मिता जागवून भाषेचा मुद्दा भावनात्मक करून त्या त्या राज्यात त्या त्या प्रादेशिक नेत्यांनी यश मिळवले. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष असलेला शिवसेना हा पक्ष, हा ही भावनात्मक राजकारण करणाराच पक्ष आहे. त्याला फार मोठी तात्त्विकभूमिका नाही. मराठी माणसांचे बोलत असताना राज्यसभेवर सगळय़ात जास्त बिगरमराठी माणसे शिवसेनेने पाठवली; पण महाराष्ट्र हा बुद्धिवादी आहे. बंगालमध्ये किंवा तामिळनाडूमधील सुशिक्षित भावनात्मक लाटेवर वाहून जाऊन एका प्रादेशिक पक्षाच्या आहारी गेले. महाराष्ट्रात शिवसेनेला मोदींची हवा निर्माण होऊनसुद्धा जेमतेम ५०-६०च्या फरकातच जागा जिंकता आल्या. सेनेला हवा करता आली नाही.

रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, हे सोयीप्रमाणे राजकारण करतात. पूर्वी ते राष्ट्रवादी बरोबर होते, आता ते भाजपाबरोबर आहेत. सत्तेचे गणित बसवून त्यांच्या पक्षाची जागा ठरते. रिपब्लिकन जनतेचे प्रश्न आणि दलित समाजाचे प्रश्न घेऊन सत्तेची पर्वा न करता ते लढले असते तर एकेकाळचा लढाऊ नेता महाराष्ट्रात बरेच काही घडवू शकला असता; पण हे जे मान्यता रद्द झालेले छोटे पक्ष आहेत त्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेत गोंधळ आहे. सत्तेच्या वळचणीला उभे राहणे, ही त्यांची वैचारिक भूमिका आहे. याला ‘वैचारिक भूमिका’ म्हणता येणार नाही.. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष यांची जी आघाडी केली त्यामागे काही तात्त्विक भूमिका होती. काँग्रेसची ध्येयधोरणे आणि रिपब्लिकन पक्षाची ध्येयधोरणे यात फार मोठे अंतर नाही. ज्या समाजाला वर्षानुवर्षे सत्ता मिळाली नाही त्यांना मुख्य प्रवाहात घेणे, हा विचार यशवंतरावांनी दिला होता; पण आता ज्या छोटय़ा छोटय़ा आघाडय़ा होत आहेत त्यात मुख्य प्रवाहात जाणे म्हणजे समाजाचे उत्थान करणे नसून, व्यक्तिगत फायदा मिळवणे आहे. मग ते महादेव जानकर असेल किंवा विनायक मेटे असतील. यांच्या भूमिका पावसाळय़ातील छत्र्यांसारख्या बदलतात. किंबहुना त्यांची राजकीय उड्डाणे कुणी गांभीर्याने घेत नाहीत. कारण ती सत्तेसाठी आहेत. जानकर सत्तेत गेले, आमदार झाले; पण धनगर समाजाचे प्रश्न आहेत तिथेच आहेत. किंबहुना आपला समाज आपल्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वासाठी वापरायचा, यातून हे नेते जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्या त्या समाजाचे भले होईल. महामानव डॉ. बाबासाहेबांनी त्यावेळच्या दलित समाजाला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’, हा जो मंत्र दिला तो व्यक्तिगत स्वार्थाकरिता दिला नव्हता. बाबासाहेबांना पैसे मिळवायचे असते किंवा पदे मिळवायची असती तर पासरी पशान त्यांच्याभोवती सगळे काही आले असते; पण त्यांनी समाजाला दिशा दिली. आज या छोटय़ा पक्षांचे नेते समाजाला दिशा देणारे आहेत, अशी त्यांची भूमिका दिसत नाही. किंबहुना सत्तेभोवती पळापळ करणारी ही मंडळी ज्या समाजाच्या भरवशावर राजकारण करतात त्या समाजाला ते वापरून घेतात आणि म्हणून त्यांचा पक्ष वाढत नाही. पक्ष वाढत नाही म्हणून त्याला मान्यता मिळत नाही. या स्थितीमध्ये या देशातील छोटय़ा पक्षांना फार भवितव्य नाही. या देशात हिंदू बहुसंख्य असून, सावरकरांसारखा नेता असताना ‘हिंदू महासभा’ किंवा ‘हिंदूंच्याच विचारावर आधारित-रामराज्य परिषद’ या भूमीत मूळे धरू शकली नाहीत. सावरकरांसारखा नेता असतानाही आणि बहूसंख्य हिंदू असतानाही हिंदू महासभेला लोकांनी नाकारले. त्याच हिंदूमहासभेच्या हिंदुत्वाचे उदात्तीकरण करून संघाचा जनसंघ झाला आणि जनसंघाचा भाजपा झाला. या पक्षाने भावनात्मक राजकारण करून देशात बहुमत मिळवले; पण त्यात तात्त्विक भूमिका जवळपास नाहीच. लाट आहे. लोकांनी बहुमतांनी निवडून दिलेले सरकार असले तरी ती निवड भावनात्मक आहे. तात्त्विक मान्यता असती तर ‘मोदींनी फसवणूक केली’, अशी भावना जनतेत निर्माण झाली नसती. तरीसुद्धा इथून पुढे देशात छोटय़ा पक्षांना भवितव्य नाही, हेच या मतदारांनी सिद्ध केलेले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version