चला गावाकडे

0

महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी सरकारी यंत्रणेला चांगलेच कामाला लावले आहे. आजवर सरकारी अधिका-यांना अशा रितीने कोणीच कामाला लावले नसेल. आता त्यांनी दर मंगळवारी व्हीडिओ कॉन्फरिन्सगद्वारा राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिका-यांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. कारभाराचे असे संगणकीकरण झाल्यामुळे संपर्क आणि संवाद सोपा होऊन कारभाराला केवळ गतीच नाही तर दर्जाही येत आहे. स्वत: सहारिया यांच्या मनात एके दिवशी एक नवी कल्पना आली. आपण ज्या राज्याचा कारभार करीत आहोत त्या राज्यातली जनता नेमकी राहाते कशी हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे असे त्यांना वाटले. तसेच राज्याच्या आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजना पोचतेय की नाही हे पाहिले पाहिजे. नेहमी नाही पण नमुना म्हणून अधूनमधून जरी या सर्वात खालच्या पातळीपर्यंत या साहेबांनी भेट दिली तरी सरकारचा कारभार नेमका कसा चालला आहे हे तो कारभार करणारांना समजेल तरी. स्वत: सहारिया यांनी ठाणे जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातल्या एका खेडयात चार मे रोजी मुक्कामच केला. एवढे मोठे साहेब आपल्या गावाला येणार म्हणताच तलाठयापासून जिल्हाधिका-यांपर्यंत सगळेच कर्मचारी, अधिकारी सावध झाले असणारच आणि त्यांनी या गावाचे खरे स्वरूप साहेबांच्या समोर येऊ नये यासाठी आवश्यक ती तरतूद केलीच असणार. तरीसुद्धा सहारिया यांना त्या गावातल्या परिस्थितीची योग्य जाणीव झालीच. त्यांना स्वत:चा असा उपक्रम एवढा आवडलाय की त्यांनी आता राज्यातल्या सर्व जिल्हाधिका-यांना महिन्यातल्या एका शुक्रवारी एका खेडयात जाऊन मुक्काम करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आता राज्यातली सगळेच जिल्हाधिकारी एका गावात जाऊन मुक्काम करायला लागले आहेत. जुन्या काळात राजा रामदेवराय किंवा अकबर असे राजे रात्री वेषांतर करून गावात फिरत असत आणि लोकांशी गप्पा मारत असत. आपण ज्याच्याशी बोलत आहोत तो प्रत्यक्ष राजा आहे हे माहीत नसल्यामुळे लोकही राजाविषयीचे आपले बरे-वाईट मत स्पष्टपणे बोलून दाखवत असत आणि आपला कारभार नेमका कसा चालला आहे याचे ज्ञान राजाला होत असे. तसाच हा काहीसा प्रकार आहे. परंतु या प्रयोगातला प्रधान वेषांतर करून जात नाही. तर गाजावाजा करून जात आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या जिल्हाधिका-यांनी एका खेडयात जाताना अगदीच काही वेषांतर करून जावे अशी अपेक्षा नाही. पण ते कोणत्या गावात मुक्काम करणार आहेत ते त्यांनी आगावू जाहीर करू नये. म्हणजे त्यांची भेट अचानक ठरेल. मग त्या गावातल्या लोकांच्या परिस्थितीचे सत्य आकलन त्यांना होईल. सहारिया यांचा उपक्रम चांगला आहे. पण त्याला पुन्हा उपचाराचे स्वरूप आले की, बघता बघता त्यातली कल्पकता कमी होऊन जाईल आणि प्रयोगातून काहीही साध्य होणार नाही. तेव्हा हा प्रयोग चाणाक्षपणे राबवायला पाहिजे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version